आमच्या सरकारच्या पायगुणामुळे ओबीसी हिताचा निर्णय झाला – पंकजा मुंडे

मुंबई – सर्वोच्च न्यायालयानं (Supreme Court) बांठिया आयोगाच्या शिफारशी काल स्विकारल्या असून या अहवालानुसार निवडणुका घेण्याचे निर्देश महाराष्ट्र निवडणूक आयोगाला दिले आहेत. यामुळं स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये इतर मागास वर्गिय उमेदवारांच्या राजकीय आरक्षणाचा (OBC Political Reservation) मार्ग मोकळा झाला आहे. याखेरीज, सर्वोच्च न्यायालयानं राज्यातील स्थगित निवडणुका घेण्यासाठी पुढील दोन आठवड्यांत वेळापत्रक जाहीर करण्यास सांगितलं आहे.

इतर मागास वर्गाच्या उमेदवारांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये 27 टक्क्यांपर्यंत आरक्षण देण्याची शिफारस जयंतकुमार बांठिया आयोगानं (Banthia Commission Report) केली आहे. राज्यातील 92 महानगरपालिका आणि चार नगर पंचायतींच्या निवडणुकांसाठी आता पुढील दोन आठवड्यांत वेळापत्रक जाहीर होण्याची प्रतीक्षा आहे.

ओबीसी आरक्षणसंदर्भात सुप्रीम कोर्टाच्या निकालानंतर भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी आनंद व्यक्त केला आहे. मागच्या सरकारने यासंदर्भात दिरंगाई केल्याने लोकांमध्ये अस्वस्थता होती, आमच्या सरकारच्या पायगुणामुळे ओबीसी हिताचा निर्णय झाला, अशी प्रतिक्रिया पंकजा मुंडे यांनी दिली. मागील सरकारने ओबीसी आरक्षणात लोकांची दिशाभूल केली होती. पण आता सोन्याचा दिवस उगवला. शब्दांत सांगता येत नाही, तेवढा आनंद मला झाला आहे. असं त्या म्हणाल्या.