नितीन गडकरी यांच्या घरासमोर भाजप- काँग्रेस आमनेसामने ! जोरदार घोषणाबाजी

नागपूर : कोरोनाच्या प्रसार करण्यासाठी कॉंग्रेसच जबाबदार असल्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्यांवरून कॉंग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावरून पुन्हा एकदा कॉंग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले आहेत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरासमोर कॉंग्रेस कार्यकर्ते आंदोलन करण्यासाठी आले होते. परंतु अगोदरच त्याठिकाणी भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामुळे रस्त्याच्या एका बाजूला कॉंग्रेस तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते आक्रमक झाले.

आज बारा वाजता नितीन गडकरी यांच्या निवास स्थानी आंदोलन करणार असल्याचं कॉंग्रेसने सांगितले होते. मात्र त्याठिकाणी अगोदरपासूनच भाजपच्या काही कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली. त्यामुळे त्याठिकाणी मोठ्या प्रमाणावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला. पोलिसांनी रस्त्याच्या एका बाजूला कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलन करण्यास सांगितले तर दुसऱ्या बाजूला भाजपचे कार्यकर्ते जोरदार घोषणाबाजी देत होते.

ईट का जवाब पत्थर से देंगें अशा प्रकारच्या घोषणा भाजपने दिल्या. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात देखील काही कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. तर आमच्या हातात काही बांगड्या घालल्या नाहीत. त्यांनी इट का पत्थर असं सांगितलंय. त्यापेक्षा आम्ही मोठ्या पद्धतीने त्यांना सामोरं जाऊ शकतो. मात्र आम्ही त्या मार्गाने जाणारे नाहीत. महाराष्ट्राच्या संस्कृतीला ज्या पद्धतीने नरेंद्र मोदी यांनी धक्का लावला आहे. त्यामुळे नितीन गडकरी यांनी नरेंद्र मोदींना विनंती करावी की, महाराष्ट्रातील जनतेची माफी मागावी.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या व्यक्तव्यांवरून राज्यात भाजपच्या प्रत्येक कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा कॉंग्रेसने दिला होता. यामुळे राज्यभरात कॉंग्रेसकडून आंदोलने करण्यात येत आहेत. नितीन गडकरी यांच्या घरासमोर देखील कॉंग्रेसने आंदोलन केले. मात्र आज नितीन गडकरी हे त्यांच्या नागपुरातील निवासस्थानी उपस्थित नाही. भाजप कॉंग्रेस मध्ये जास्त वाद होऊ नये म्हणून कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी त्यांच्या घरापासून लांबच थोपवून धरलं आहे.