महाविकास आघाडीने शब्द फिरवला! अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला नाहीच

मुंबई – विधीमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूर इथं घेणं शक्य नसल्याचं राज्य सरकारनं म्हटलं आहे. अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी ही माहिती दिली. राज्यपालांच्या अभिभाषणासाठी दोन्ही सदनांची संयुक्त बैठक घेता येईल असं सभागृह नागपूर इथल्या विधान भवनात उपलब्ध नाही, तिथलं आमदार निवास सध्या कोविड विलगीकरणासाठी वापरलं जात आहे. ही माहिती राज्यपालांना देण्यात आली असून, याबाबतचा अंतिम निर्णय 15 तारखेला होणाऱ्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत होणार असल्याचं, मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, मुंबईला झालेल्या हिवाळी अधिवेशनात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची घोषणा केली होती. घोषणेनुसार २८ फेब्रुवारीपासून हे अधिवेशन सुरू होणार होते. विधिमंडळ सचिवालयाने १६ फेब्रुवारीपासून सचिवालयाचे काम नागपूरमध्ये सुरू होणार असल्याचे परिपत्रकही काढले होते.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंत्रिमंडळातील काही वरिष्ठ मंत्री अधिवेशन नागपूरला घेण्यासाठी अनुत्सूक आहे. त्यामुळेच अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईला घेण्याचे ठरविण्यात आले. प्रामुख्याने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते नागपूरमध्ये अधिवेशन घेण्यास उत्सूक नसल्याचे देखील सांगण्यात येत आहे.