विजयी भव: ! मोदींच्या सभेची म्हापश्यात जंगी तयारी

म्हापसा : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे आज गोव्यात येत आहेत. ते म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या समोरील जागेत ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान 11 तारखेला गोव्यात येणार असे कळविण्यात आले होते. मात्र, मोदी यांचा दौरा 10 रोजी ठरला आहे.

दरम्यान,  संध्याकाळी 4 वाजता होणाऱ्या या मोदींच्या सभेची जवळपास सर्व तयारी पूर्ण झाली असून ही सभा कोरोना नियमांचे पालन करत जंगी स्वरूपात करण्याचे भाजपने नियोजन केले आहे. भव्य स्टेज या ठिकाणी उभारण्यात आले असून सभेच्या ठिकाणाच्या जवळच  हेलीपॅड बनवण्यात आले आहे. याशिवाय कोणताही अनुचित प्रकार टाळण्यासाठी मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे.

दरम्यान, देशभरातील तरुणांवर सध्या मोदींची जादू चालताना  पाहायला मिळत असल्याने या सभेमुळे युवकांची मते भाजपकडे वळू शकतील असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. तसेच भाजप सरकारकडून विविध योजनांच्या माध्यमातून उद्योग,व्यवसाय वाढीसाठी प्रयत्न केले जात असल्याने मोदींच्या सभेमुळे उद्योजक,छोटे-मोठे व्यापारी यांचा देखील भाजपला पाठींबा मिळू शकेल असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.

याशिवाय गोव्यातील पर्यटन, गोव्यातील विकास, तसेच सर्वसामान्य गोवेकरांबाबत मोदी नेमके कोणते विचार मांडणार याकडे आता सर्वांचे लक्ष असणार आहे. यामुळेच ही सभा गोवा भाजपसाठी बुस्टर डोस प्रमाणे काम करणार आहे. दरम्यान, ठिकठिकाणी स्क्रीन्स लावून या सभेचे प्रसारण गोव्यातील जनतेपर्यंत पोहचविण्याचे देखील नियोजन प्रदेश भाजपने केले आहे.