वाबळेवाडीचे वारे गुरूजीचं निलंबन मागे घेताच आता थेट मंत्रालयात निवड

पुणे : आंतरराष्ट्रीय पातळीवर दर्जा प्राप्त वाबळेवाडीची जिल्हा परिषद शाळा सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडली होती. या शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय वारे यांच्यावर राजकीय षढ़यंत्र रचून कामात हलगर्जीपणा, अनियमितता आणि बेजबाबदारपणा हे आरोप ठेवून निलंबित केले होते. मात्र जिल्हा परिषदेने केलेल्या चौकशीत काहीही निष्पन्न न झाल्याने वारे गुरूजीचं निलंबन जिल्हा परिषदेकडून मागे घेण्यात आले. निलंबन मागे घेतल्यानंतर आता वारे गुरुजी यांची राज्याचे राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी शिक्षण मंत्रालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून निवड केली आहे. यासंदर्भात त्यांना पत्रही प्राप्त झाले आहे.

वारे गुरूजी यांचं निलंबन मागे घेतल्यानंतर त्यांची खेड येथे बदली करण्यात आली होती. मात्र वाबळेवाडीच्या ग्रामस्थांनी वारे गुरूजींना परत याच शाळेत घ्यावं, अशा मागणी करत त्यासाठी आंदोलन करण्याचा पवित्रा घेतला. मात्र त्याआधीच त्यांना बच्चू कडू यांनी मंत्रालयात विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून सामावून घेण्याचा निर्णय घेतला. याबाबतच्या पत्राची दखल ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी दखल घेऊन वारे गुरूजींना सेवामुक्त करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांना दिले आहेत.

आंतरराष्ट्रीय स्थरावर वाबळेवाडीच्या जिल्हा परिषेद शाळेला दर्जा प्राप्त करून देण्यात वारे गुरूजींचा मोठा वाटा होता. एक दोन वर्गखोल्या असलेली शाळेला काचेच्या भिंती उभारण्यात वारे गुरूजी दिवसरात्र मेहनत घेत होते. २०१२ साली शाळेची पटसंख्या अवघी ३२ होती. त्या शाळेत प्रवेश घेण्यासाठी आता वेटींग लिस्ट लागत होती. शाळेत प्रवेश न मिळल्यामुळे वारे गुरूजी यांच्यावर राजकीय सुडबुद्धीने आरोप ठेवण्यात आले होते. यानंतर शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली होती. वारे गुरूजी यांची तब्बल सहा महिने चौकशी करण्यात आली. परंतु चौकशीत काहीही निष्पन्न न झाल्याने वारे गुरूजीचं निलंबन मागे घेण्यात आले.

मंत्रालयात निवड झाल्यानंतर वारे गुरूजी यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, मला मोठ्या स्तरावर काम करण्याची राज्याचे राज्य शिक्षण मंत्री बच्चू कडू यांनी मला संधी दिली. माझ्यासोबत झालेला सर्व प्रकार मी विसरून गेलो आहे. आता राज्यासाठी, देशासाठी काय करता येईल, याचा विचार सध्या मी करीत आहे. राज्यातील शाळांमध्ये नाविन्यपूर्ण प्रकल्प राबविण्याचे मी संकल्प केला आहे.