भाजपने देशाची ‘अमीर हिंदुस्थान’ आणि ‘गरीब हिंदुस्थान’मध्ये विभागणी केली : राहुल गांधी

पणजी : भाजपवर टीका करताना, काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी शुक्रवारी आरोप केला की या पक्षाने देशाची ‘अमीर हिंदुस्थान’ आणि ‘गरीब हिंदुस्थान’मध्ये विभागणी केली आहे. ‘‘ आम्ही गोव्यामध्ये सरकार स्थापन केल्यावर ‘न्याय’ योजना राबवणार आहोत, ज्याच्या अंतर्गत प्रत्येक गरीब कुटुंबाला वार्षिक ७२ हजार रुपये मिळतील.’’ असे ते म्हणाले.

साखळी येथे झालेल्या सभेत राहुल गांधी बोलत होते. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि निवडणूक रणनीतीकार पी. चिदंबरम, ज्येष्ठ नेते प्रतापसिंह राणे, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत, गोवा प्रभारी दिनेश गुंडू राव, जीपीसीसी अध्यक्ष गिरीश चोडणकर, के सी वेणुगोपाल, खासदार फ्रान्सिस सार्दिन, रमाकांत खलप, अमरनाथ पणजीकर आदी उपस्थित होते.

“ओपिनियन पोलाच्या दरम्यान काँग्रेसने गोव्याला राज्य विलीन करायचे की स्वतंत्र ओळख राखून ठेवायची ते निवडण्याचे स्वातंत्र्य दिले. काँग्रेसने नेहमीच गोव्यातील जनतेला पाठिंबा दिला आहे. आता तुमचे सरकार कोणी चालवायचे आहे हे तुम्हीच ठरवायचे आहे. मी तुम्हाला आश्वासन देतो की पूर्ण बहुमताने काँग्रेस सरकार स्थापन करेल आणि ते लोकांचे सरकार असेल.’’ असे राहुल गांधी म्हणाले.

“काँग्रेसने नेहमीच लोकांच्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. लोकांच्या संमतीने आणि त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही विकास करतो. पण भाजपने गोव्यात लोकशाहीची हत्या केली आहे आणि लोकांच्या इच्छेविरुद्ध जाऊन पर्यावरणाचा ऱ्हास केला आहे.’’ असा आरोप त्यांनी केला.

ते म्हणाले की, काँग्रेस पक्ष भाजपला गोव्याला कोल हब बनवू देणार नाही. “गोवा पर्यटनसाठी ओळखला जातो. पर्यटन आणि कोल हबचे प्रदूषण एकत्र चालू शकत नाही. कोळसा प्रदूषण पाहिल्यास पर्यटक येथे का येतील.’’ असा प्रश्न राहुल गांधी यांनी केला.

“भाजपने देशाची ‘अमीर हिंदुस्थान’ आणि ‘गरीब हिंदुस्थान’मध्ये विभागणी केली आहे. अंबानी आणि अदानी सारखे श्रीमंत लोक संपत्ती मिळवत आहेत आणि आमचे गरीब लोक बेरोजगारी, रुग्णालयातील सेवा, शिक्षण आणि ऑक्सिजनपासून वंचित आहेत. आम्हाला ही परिस्थिती बदलायची आहे.” असे राहुल गांधी म्हणाले.

ते पुढे म्हणाले की जीएसटीच्या अंमलबजावणीमुळे केवळ श्रीमंत व्यक्तींनाच फायदा झाला, परंतु लहान व्यवसायांचे नुकसान झाले. जनता आणि काँग्रेसची भागीदारी गोव्याला पुढे नेणार असल्याचे ते म्हणाले. “कोणीही उपाशी झोपू नये त्यासाठी आम्ही आमच्या जाहीरनाम्यात योजनांचे आश्वासन दिले आहे. आम्ही सत्तेत आल्यानंतर त्यांची अंमलबजावणी करू.” असे ते म्हणाले.

राहुल गांधी म्हणाले की, काँग्रेसचे लक्ष रोजगार निर्मितीवर आहे. “ते कसे तयार करायचे ते आम्हाला माहित आहे आणि वचने प्रत्यक्षात आणू . नवीन गोवा आणि नवीन सरकार स्थापन करण्यासाठी काँग्रेसला लोकांनी साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.