कोराडी व खापरखेडा औष्णीक वीज निर्मिती प्रकल्पामुळे होणाऱ्या प्रदूषणावर काय तोडगा काढला? – बावनकुळे

नागपूर : राज्यातील कोराडी व खापरखेडा औष्णीक वीज निर्मिती प्रकल्पामुळे परिसरातील वायु व जल प्रदूषण वाढत असल्याच्या तक्रारी स्थानिक नागरिकांकडून येत आहेत. ऊर्जा मंत्रालयाने याबाबत काय तोडगा काढला असा प्रश्न आज आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधान परिषदेत विचारला. त्यास उत्तर देताना महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने विशेष लक्ष घालून निर्णय घेतले असल्याची माहिती ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी दिली.

औष्णीक वीज निर्मिती प्रकल्पामुळे नागपूर शहराजवळील कोराडी व खापरखेडा भागातील प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. येथील नागरिकांना श्वसनाचे आणि फुफ्फुसांचे आजार बळावले असून, या समस्येची तक्रार स्थानिकांनी वेळोवेळी केली आहे. या तक्रारींवर राज्याच्या ऊर्जा मंत्रालयाने काय पाठपुरावा केला यासंदर्भात आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी विचारणा केली. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाने महानिर्मितीच्या खापरखेडा औष्णिक वीज निर्मिती केंद्रालगतच्या परिसराची पाहणी केली. प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी नांदगाव तलावात राख न टाकण्याचे निर्देश निर्मिती केंद्रास दिले असल्याचे डॉ. नितीन राऊत म्हणाले. तसेच पूर्वीपासून असेलेली राख तात्काळ उचलण्याचे निर्देश दिले असल्याचे त्यांनी सांगितले.

कोराडी व खापरखेडा वीज निर्मिती प्रकल्पातील प्रदुषणाबाबत मंथन, सी.एफ.एस.डी. आणि असर संस्थाद्वारे अभ्यासपूर्ण अहवाल प्रकाशित करण्यात आला आहे. तो अहवाल देखील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे पाठवण्यात असल्याचे डॉ. नितीन राऊत यावेळी म्हणाले.