समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचं काम भाजपच करत आहे; रोहित पवार भडकले 

नाशिक-  राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या विषयी आक्षेपार्ह पोस्ट करणारा नाशिकच्या सटाणा येथील निखिल भामरे आता भाजपचा पदाधिकारी झाल्याचे समोर आले आहे. भाजपकडून सोशल मीडिया सेलच्या 21 पदाधिकाऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यामध्ये निखित भामरे याचंही आहे. यामध्ये 1 संयोजक आणि त्यांच्या नेतृत्वाखाली राज्याचे 5 सह संयोजक आहेत, त्यामध्ये निखिल भामरेची वर्णी लागली आहे.

दरम्यान, या नियुक्तीवर राष्ट्रवादीने आक्षेप नोंदवला आहे.दुसऱ्या बाजूला आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी देखील या मुद्द्यावर भाष्य केले आहे. ते म्हणाले, सोशल मिडियात मा. पवार साहेबांविषयी आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्या निखिल भामरे याची भाजपकडून सोशल मिडियाचा सहसंयोजक म्हणून नेमणूक केली जाते, म्हणजेच समाजात विकृतीला खतपाणी घालण्याचं काम भाजपच करत असल्याचं स्पष्ट झालंय. समाजात विष कालवणाऱ्या या विकृत कृतीचा तीव्र निषेध! भाजपच्या आणि त्यांच्या मित्र पक्षाच्या किती नेत्यांकडून या कृतीला विरोध होतो, हेच आता बघायचंय..असं म्हणत रोहित पवार यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

याबाबत खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्वीट करत भाजपवर आगपाखड केली आहे. त्या म्हणाल्या, आदरणीय पवार साहेबांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या इसमाला भाजपाने सोशल मिडिया सेलचा पदाधिकारी म्हणून नियुक्ती दिली. देवेंद्रजी – तुम्ही महाराष्ट्राचे गृहमंत्री आहात, संसदेत काल केंद्रीय गृहमंत्री अमितभाई शहा सिद्धांताबद्दल बोलले, आपण सिद्धा़तांचे पालन करताय का? एका गुन्हेगारी मानसिकतेच्या व्यक्तीला राजाश्रय दिला जातो ही अतिशय खेदाची आणि गंभीर बाब आहे.असं सुळे यांनी म्हटले आहे.