कौतुक तर होणारच! क्रिकेटर पंतचा जीव वाचणाऱ्या ‘त्या’ देवदूताचा हरियाणा रोडवेजकडून सन्मान

उत्तराखंड| हरियाणा राज्य परिवहन महामंडळाने (Haryana Roadways) शुक्रवारी क्रिकेटपटू ऋषभ पंतचा (Rishabh Pant’s Saviour) जीव वाचवणाऱ्या ड्रायव्हर आणि कंडक्टरचा गौरव केला. दिल्ली-डेहराडून महामार्गावर झालेल्या अपघातात क्रिकेटपटू ऋषभ पंतला त्याच्या मर्सिडीज कारमधून बाहेर पडण्यास मदत करणाऱ्या हरियाणा राज्य परिवहन महामंडळाचा ड्रायव्हर सुशील कुमार (Sushil Kumar) आणि कंडक्टर परमजीत यांना सन्मानित (Honored) करण्यात आले आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, हरियाणा राज्य सरकार दोघांचाही सन्मान करू शकते. हरियाणा राज्य परिवहन महामंडळाचे पानिपत डेपोचे महाव्यवस्थापक कुलदीप जांगरा म्हणाले, “पानीपतला परतल्यावर आम्ही त्यांना आमच्या कार्यालयात सन्मानपत्र आणि स्मृतिचिन्ह दिले.” ते म्हणाले की सुशील कुमारने कार रस्त्याच्या दुभाजकाला धडकताना पाहिली, त्यानंतर तो कंडक्टरसह थांबला आणि मदतीसाठी धावला. ड्रायव्हर आणि कंडक्टर या दोघांनीही माणुसकीचा आदर्श ठेवल्याचेही जांगरा यांनी सांगितले.

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, नवी दिल्लीहून उत्तराखंडमधील रुरकीला जाणारी ऋषभ पंतची मर्सिडीज कार  शुक्रवारी पहाटे 5.15 वाजता नरसन सीमेवर रेलिंगला धडकली. अपघातानंतर कारने पेट घेतला. सुदैवाने हरियाणा राज्य परिवहन महामंडळाची एक बस तिथून जात होती. या बसचे चालक सुशील कुमार आणि स्टाफने विंडो स्क्रीन (Rishabh Pant Accident) तोडून पंतला गाडीतून बाहेर काढले. त्यावेळी तो कारमध्ये एकटाच होता. मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे कार चालवत असताना त्याला झोप लागली आणि काही सेकंदातच कार अनियंत्रित होऊन दुभाजकावर आदळली आणि अपघात झाला.

बीसीसीआयने पंतच्या दुखापतीबद्दल दिले अपडेट
पंतच्या (Rishabh Pant Health Update) अपघाताबाबत बीसीसीआयने (BCCI) निवेदन प्रसिद्ध केले आहे. त्यात त्यांनी सांगितले की, ऋषभ पंतच्या डोक्याला दोन कट आहेत. त्याच्या उजव्या गुडघ्यातील अस्थिबंधन फाटले असून उजव्या हाताच्या मनगटावर, घोट्याला, पायाच्या बोटाला दुखापत झाली आहे. तसेच, त्याच्या पाठीवर घर्षणाची जखम आहे. पंतची प्रकृती स्थिर असून त्याला आता डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. त्याच वेळी, त्याच्या जखमा शोधण्यासाठी आणि त्याच्या पुढील उपचारांसाठी एमआरआय स्कॅन केले जाईल.

बीसीसीआय ऋषभच्या कुटुंबीयांच्या सतत संपर्कात आहे, तर वैद्यकीय पथक ऋषभवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांच्या सतत संपर्कात आहे. ऋषभला सर्वोत्कृष्ट वैद्यकीय सेवा मिळावी आणि या वेदनादायक अवस्थेतून बाहेर पडण्यासाठी सर्वतोपरी मदत मिळावी याची बोर्ड काळजी घेत आहे.