आम्ही काय करतोय, हे उर्फीसारख्या उर्फीट बाईला सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही; चित्रा वाघ संतापल्या

मुंबई- ‘बिग बॉस फेम’ अभिनेत्री उर्फी जावेद (Urfi Javed) ही नेहमीच तिच्या बोल्ड लूक्समुळे चर्चेत असते. अतरंगी कपडे घालून मुंबईच्या रस्त्यांवर फोटोग्राफर्स किंवा पॅपाराझींपुढे पोज देतानाही ती अनेकदा दिसली आहे. यामुळे तिला अनेकदा ट्रोलचा सामनाही करावा लागत असतो. मात्र यावेळी उर्फी भाजपा महाराष्ट्र महिला मोर्चाच्या अध्यक्षा चित्रा किशोर वाघ (Chitra Wagh) यांच्या नजरेत आली असून त्यांनी रविवारी तिच्याविरुद्ध मुंबई पोलिसात तक्रार (Mumbai Police) दाखल केली आहे आणि तिच्यावर तात्काळ कारवाईची मागणी केली. चित्रा वाघ यांनी उचललेल्या या पावलानंतर उर्फीने (Urfi Javed Reply To Chitra Wagh) त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.

उर्फी जावेदचे चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर
उर्फीने चित्रा वाघ यांच्याविरोधात रोखठोक भूमिका घेत इंस्टाग्राम स्टोरीद्वारे त्यांना प्रत्युत्तर दिले आहे. ‘मला कधीही खटला किंवा मूर्खपणा नको आहे, जर तुम्ही तुमची आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची संपत्ती उघड केली तर मी आत्ता तुरुंगात जाण्यास तयार आहे. याशिवाय तुमच्या पक्षातील अनेक नेत्यांवर वेळोवेळी छेडछाडीचे आरोप झाले आहेत, त्या महिलांसाठी तुम्ही चित्रा वाघ कधीच काही बोलला नाही,’ असे उर्फीने लिहिले आहे.

तसेच तिने आणखी एक पोस्ट करत म्हटले की, हे राजकारणी आणि वकील मुके आहेत का? घटनेत असा कोणताही कायदा नाही, ज्याद्वारे मला तुरुंगात पाठवले जाऊ शकते.

उर्फीने अश्लीलतेची व्याख्या सांगताना लिहिले की, ‘अश्लीलतेची व्याख्या व्यक्तीपरत्वे बदलते. जोपर्यंत माझे प्रायव्हेट पार्ट दिसत नाहीत तोपर्यंत तुम्ही मला तुरुंगात पाठवू शकत नाही. मीडियाचे लक्ष वेधण्यासाठी हे लोक असे करतात. चित्रा वाघ माझ्याकडे तुमच्यासाठी चांगल्या कल्पना आहेत. मुंबईतील मानवी तस्करी, बेकायदेशीर डान्सबार, बेकायदेशीर वेश्याव्यवसाय जे पुन्हा मुंबईत सर्वत्र सुरू आहे, याबाबत काही तरी करावे,’ अशा शब्दांत उर्फीने प्रत्युत्तर दिले आहे.

चित्रा वाघ आक्रमक भूमिकेत
यावर आता चित्रा वाघ यांनी उर्फीची कानउघडणी केली आहे. ‘काहीही बोलून आमच्यावर हल्ले करा. आम्ही काय करतोय, हे उर्फीसारख्या उर्फीट बाईला सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. जो … नाच चाललाय तो महाराष्ट्राची संस्कृती नाही. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात संस्कृतीचा हा नाच दिसत नाही का?,’ असा सवालही चित्रा वाघ यांनी केला.