महागाई वाढली, अण्णा हजारे जागे व्हा; राळेगणसिद्धीमध्ये अण्णांच्या विरोधात होणार आंदोलन

राळेगणसिद्धी – ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Senior social activist Anna Hazare) यांनी लोकायुक्ताच्या मुद्यावर राज्यातील महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) आंदोलनाचा इशारा दिला आहे असताना आता अण्णांची कोंडी होण्याची शक्यता आहे. कारण सरकारच्या विरोधात नेहमी आंदोलन करणाऱ्या अण्णा हजारे यांच्याविरोधातच आताआंदोलन करण्यात येणार आहे. राळेगणसिद्धी येथेच अण्णा हजारेंविरोधात आंदोलन (There will be agitation against Anna Hazare) करणार असल्याचा इशारा सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ काशिद (Social worker Somnath Kashid) यांनी दिला आहे.

झोपी गेलेल्या अण्णा हजारे यांना उठवण्यासाठी 1 जून रोजी  हे आंदोलन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.  मागील दोन लोकसभा निवडणुकी दरम्यान भाजप सरकारने दिलेली आश्वासने पाळली नाहीत. त्याशिवाय, महागाईतही प्रचंड वाढ झाली आहे. सामान्यांना मोठा त्रास होत असूनही अण्णा हजारे यांनी एक शब्दही सरकारविरोधात काढला नाही. त्यामुळे राळेगणसिद्धी येथे अण्णा हजारेंविरोधात ‘अण्णा उठो’ आंदोलन करण्यात येणार असल्याचे सोमनाथ काशिद यांनी म्हटले.

केंद्रात भाजपचे सरकार आल्यानंतर अण्णा हजारे यांनी सरकारविरोधात भूमिका घेतली नसल्याचा आरोप करण्यात येतो. युपीए-2 च्या कार्यकाळात भ्रष्टाचाराच्या मुद्यावरून अण्णा हजारे आणि इतरांनी मोठे आंदोलन उभारले होते. त्याच्या परिणामी काँग्रेस सरकार विरोधात जनमत तयार झाले, असे म्हटले जाते. तर, वाढत्या वयोमानानुसार, प्रकृतीच्या कारणांमुळे अण्णा हजारे आंदोलन करू शकत नसल्याचे त्यांच्या समर्थकांनी सांगितले.