भाजप नेत्याच्या पुतण्याचा अपघाती मृत्यू, सीटबेल्ट लावल्याने मित्र वाचला

Vishwajit Jagtap Accident : माजलगावचे भाजपा नेते मोहन जगताप (Mohan Jagtap) यांचे पुतणे विश्वजीत जीवन जगताप (Accident) यांचा अपघातात मृत्यू झाला आहे. औरंगाबादहून माजलगावला काम आटोपून परत येत असताना रात्री 12 वाजण्याच्या दरम्यान गेवराईजवळ त्यांचा अपघात झाला. या भीषण अपघातात त्यांच्या जागीच मृत्यू झाला आहे.

माजलगाव येथील छत्रपती नागरिक सहकारी पतसंस्थेचे चेअरमन जीवनराव जगताप यांचे चिरंजीव विश्वजीत जगताप व त्यांचा मित्र आर्यन कंटुले हे काही कामानिमित्त औरंगाबाद येथे गेले होते. काम आटपून गावी माजलगावच्या दिशेने परत येत असताना गेवराई जवळ बायपास रोडवर रात्री बाराच्या दरम्यान त्यांच्या चार चाकी वाहनावरील विश्वजीत यांचा ताबा सुटला. त्यामुळे त्यांची कार टेम्पोवर जाऊन धडकली.

या दुर्घटनेत विश्वजीत जगताप यांच्या डोक्याला जबर मार लागून त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासह असलेल्या मित्र आर्यन कंटुले याने सीट बेल्ट लावलेला असल्याने त्याला सुदैवाने किरकोळ मार लागला. विश्वजीत हा जिवन जगताप यांचा एकुलता एक मुलगा होता. यांच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे.