लक्ष्मण जगताप यांच्या पक्षनिष्ठेला सलाम; आजारी असल्याने मतदानासाठी अॅम्ब्युलन्सने येणार

Mumbai – राज्यसभेच्या राज्यातल्या 6 जागांसाठी आज मतदान होणार आहे. शिवसेनेकडून संजय राऊत आणि संजय पवार, राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेसकडून इमाम प्रतापगढी तर भारतीय जनता पार्टीने पीयूष गोयल, अनिल बोंडे आणि धनंजय महाडिक यांना उमेदवारी दिली आहे.

या निवडणुकीत उमेदवाराला पहिल्या पसंतीच्या 41 मतांची गरज आहे. संख्याबळानुसार शिवसेनेचे 55 आमदार, राष्ट्रवादी काँग्रेसचे 53 आमदार आणि काँग्रेसचे 44 आमदार आहेत. तर विरोधी पक्ष भाजपाकडे 106 आमदार आहेत. त्यानुसार भाजपाचे दोन आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, आणि काँग्रेसचा प्रत्येकी एक उमेदवार निवडून येऊ शकतो.

भाजपाला तिसऱ्या आणि शिवसेनेला दुसऱ्या जागेसाठी अपक्ष तसंच अन्य पक्षांच्या आमदारांच्या मतांची गरज आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आणि समाजवादी पक्षानं महाविकास आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.आपल्या एकाही आमदारांचं मत कमी पडू नये यासाठी राजकीय पक्ष सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. पिंपरी चिंचवडमधील भाजपचे   राज्यसभेच्या मतदानासाठी मुंबईत येणार असल्याचं निश्चित झालं आहे. ते सकाळी साडेआठच्या सुमारास मुंबईला रवाना झाले. लक्ष्मण जगताप महामार्गाद्वारे अॅम्ब्युलन्समधून मुंबई गाठणार आहेत. दरम्यान आजारी असल्याने लक्ष्मण जगताप यांना मतदानासाठी मुंबईत आणण्यासाठी रस्तेमार्गासह एअर लिफ्टचीही सुविधा तयार ठेवण्यात आली होती.

आमदार लक्ष्मण जगताप हे गेल्या दोन महिन्यांपासून आजाराने त्रस्त आहेत. कोमातून बाहेर आल्यानंतर 2 जूनला त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला. अशा परिस्थितीत ते मतदानाला मुंबईला गेले तर ते त्यांच्या प्रकृतीसाठी जिकिरीचं ठरेल. त्यामुळे कुटुंबीय मतदानासाठी त्यांना मुंबईला पाठवण्याच्या मनस्थितीत नव्हते. मात्र पक्षाचा आग्रह असल्याने अखेर ते मतदानाला जाणार हे निश्चित झालं आहे.