‘शरद पवारांना देवेंद्र फडणवीसांविषयी प्रचंड पोटशूळ आहे, कारण….’

maratha reservation : शरद गोविंदराव पवार (Sharad Pawar) हे चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते. तसेच पी.व्ही. नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्री म्हणून आणि मनमोहन सिंग यांच्या मंत्रिमंडळात कृषी मंत्री म्हणून त्यांनी काम केले. राज्यातही ते अनेकदा मंत्री झाले. सातत्याने आमदार किंवा खासदार पदावर आहेतच. किमान 3 राज्य सरकारांचे ते रिमोट कंट्रोल होते. त्यांच्याएवढा जबरदस्त राजकारणी नाही, असे मत मीडियातील त्यांच्या भक्तांकडून वारंवार बिंबवले जाते. या लोकांनी त्यांची प्रतिमा Larger than Life करून ठेवली आहे.असं भाजप प्रवक्ते शिवराय कुळकर्णी (Shivray Kulkarni) यांनी म्हटले आहे..

प्रसिद्धीपत्रकात ते म्हणतात,  याच प्रचंड अनुभवाच्या पावसात भिजलेल्या शरद पवारांनी आपल्या जीवनात कधीच मराठा समाजाच्या आरक्षणाला महत्व दिले नाही. उलट संधी मिळेल तेव्हा तेव्हा त्यांनी या मुद्द्याला फाट्यावरच मारले आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात मराठा राजकारणाचा अर्ध्वर्यू मानल्या जाणाऱ्या पवारांनी आजवर मराठ्यांना आरक्षण का मिळू दिले नाही, हा सवाल राज्यातील मराठा समाजानेच प्रथम त्यांना विचारायला हवा. खरं तर हा सवाल राज्यातील अठरा पगड जातींना देखील पडला आहे.

पवार पुणेरी पगडी नाकारतात पण तेवढ्याच दिमाखाने हजची टोपी चढवून मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याची खुले आम भाषा बोलतात. मराठा समाजाची मते घेऊन मुस्लिमांमुळे आपण निवडून येतो असे जाहीर मतप्रदर्शन करतात. मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आंदोलन करणाऱ्या शालिनीताई पाटील यांना राजकारणातून संपवण्याचा game plan पवारच आखतात. महाराष्ट्रात अतिशय शिस्तीत निघालेल्या मराठा मोर्चाला आपला पाठींबा नसल्याची खुली भूमिका पवारांनी त्यावेळी घेतली.

राज्यात मराठा आरक्षणापेक्षा अनेक महत्त्वाचे प्रश्न आहेत हे पवारांच्या लाडक्या कन्या सुप्रिया सुळे यांनी देखील ठासून सांगितले. देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजाला आरक्षण मिळवून दिले. नंतर ते आरक्षण टिकवण्याची जबाबदारी त्यांनी स्वतःवर घेतली. उच्च न्यायालयात देखील आरक्षण टिकले. मात्र, पवार आधारवड असलेल्या नाकर्त्या महाविकास आघाडी सरकारने जाणीवपूर्वक सर्वोच्च न्यायालयात मराठा समाजाचे आरक्षण टिकू नये अशी व्यूह रचना आखली. यामागे उद्देश एकच होता, तो म्हणजे मराठा आरक्षणाचे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना मिळू नये.

शरद पवारांना देवेंद्र फडणवीसां विषयी प्रचंड पोटशूळ आहे. प्रचंड राजकीय अनुभव पाठीशी असलेल्या या वयोवृद्ध नेत्याची देवेंद्र फडणवीस नामक युवा नेत्याने झोप उडवली आहे. स्वतःच्या जातीचे मोठे पाठबळ नसताना, राज्यातील अठरा पगड जातींना एकत्र करून, समाजामध्ये प्रचंड विश्वास प्राप्त करून देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात स्वतःचे नेतृत्व सिद्ध केले. आजवरच्या राजकीय आयुष्यात पवारांना मिळालेले राजकीय यश आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात भाजपाला मिळालेले यश याची तुलनाच होऊ शकत नाही. मीडियातील एक कंपू पवारांचे कितीही कौतुक करो, प्रत्यक्षात देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना राजकीय मात दिलेली आहे. पवारांची ही सगळ्यात मोठी पोट दुखी आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात तर शरद पवारांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. उद्धव ठाकरे आणि शरद पवार या दोघांचीही राज्याच्या राजकारणात केविलवाणी अवस्था आहे.

आता पुन्हा मराठा आरक्षणाचा मुद्दा ऐरणीवर येणे आणि आंदोलन चिघळणे यामागे कोण ? या प्रश्नाचे निर्विवाद उत्तर शरद पवार हेच आहे. काल-परवापर्यंत प्रकाश झोतात नसलेला जरांगे नामक आंदोलनकर्ता जी भाषा वापरतो आहे, त्यावरून या आंदोलनामागे कळीचा नारद म्हणून शरद पवार हेच भूमिका वठवत असल्याचे स्पष्टपणे दिसून येते आहे. पवार भेटायला गेले तेव्हाचे जरांगे यांचे वागणे, नंतरचे दोषारोपण हे सारे बघता या खटाटोपा मागे हा प्रश्न सुटावा ही मानसिकता नाही. राज्यातील सरकार अस्थिर व्हावे हा एकमेव अजेंडा आहे. 2014 ते 2019 सलग पाच वर्षे देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री असताना अशा तऱ्हेच्या आंदोलनांना कोण जन्म देत होतं, हे आता महाराष्ट्रापासून लपून राहिलेले नाही.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी अतिशय शिताफीने ते सर्व प्रश्न सोडवले, हे त्यांचे खरे कौशल्य आहे. आताही मराठा आरक्षणावर सारेच लोक राजकारण करणार आहेत. पण हा प्रश्न सोडवण्याची कुवत फक्त देवेंद्र फडणवीस यांचीच आहे. अंधाराच्या भीतीने सूर्य कधी लपत असतो काय ? तसेच फडणवीसांचे आहे. ते कधीही पळ काढणार नाहीत. योग्य वेळी, योग्य त्या सर्व उपाययोजना करून ते हा देखील प्रश्न सोडवतील. छत्रपती उदयनराजेंनी दिलेली, देवेंद्रजी जातीपातीच्या वर उठून काम करतात, ही जाहीर पावती लाख मोलाची आहे. आता तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील त्यांच्या साथीला आहेत. वसंत ऋतू येताच कावळा आणि कोकीळ यातील फरक जसा स्पष्ट होतो, तसेच याही प्रश्नाच्या संदर्भात घडलेले महाराष्ट्राला दिसणार आहे. शरदराव तुम्ही वणवे भडकवत राहा, देवेंद्र फडणवीस शांतपणे समाजाला न्याय देण्याच्या मानसिकतेने काम करतील.