महाविकास आघाडी सरकार दगडाच्या काळजाचं आहे – दरेकर

मुंबई – एसटी कर्मचारी आज पुन्हा एकदा आक्रमक झाले असून राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar)  यांच्या मुंबईतील सिल्व्हर ओक (Silver oak) या निवासस्थानी आज धडक दिली .आंदोलकांनी यावेळी पवार यांच्या घरावर चप्पल फेक केली तसेच काही आंदोलकांनी बांगड्या देखील फेकल्या आहेत.

एसटीच्या विलीनीकरणात (ST workesrs) शरद पवारांनी आणि अजित पवारांनी अडथळा आणल्याचा आरोप या एसटी कर्मचाऱ्यांकडून करण्यात येत आहेत. एसटीचे शासनात विलीनीकरण करावे या मागणीवर एसटी कर्मचारी अजूनही ठाम आहेत. तसेच या एसटी कर्मचाऱ्यांनी बारामतीत जाऊन आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. आम्हाला बारामतीत येण्यापासून थांबवून दाखवा असे थेट आव्हान आता एसटी कर्मचाऱ्यांनी दिलं आहे.दरम्यान, या घटनेनंतर आता राजकीय आरोप-प्रत्यारोप देखील होऊ लागले आहे. सत्ताधारी नेते हे भाजपला आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा प्रयत्न करत  आहेत तर विरोधक देखील जशास तसे उत्तर देत आहेत.  याप्रकरणी भाष्य करताना विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी म्हटलं,

मृत्यू होऊनही सरकारनं एसटीच्या मुद्द्याकडे गांभीर्यानं पाहिलं नाही. अनिल परब, अजित पवार यांनी सातत्यानं कठोर भूमिका घेतली. राज्यकर्त्यांनी असं वागू नये. एसटी कर्मचाऱ्यांसमोर काहीच पर्याय उरला नाही. मग ते सरकारचे जे सर्वेसर्वा आहेत, त्यांच्या घराबाहेर जमले. महाविकास आघाडी सरकार दगडाच्या काळजाचं आहे.