जर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर पुण्येश्वर मंदिराबद्दल त्यांची भूमिका काय असेल?, फडणवीसांचा धंगेकरांना सवाल

पुणे- अवघ्या दोन दिवसांवर आलेल्या कसबा पेठ निवडणुकीचा (Kasba Bypoll Election) प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. हेमंत रासने विरुद्ध रविंद्र धंगेकर अशी लढत या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि महत्वाचे नेते कसब्यामध्ये तळ ठोकून बसलेले आहेत. काल (२३ फेब्रुवारी) कसब्यामध्ये देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी एका प्रचारसभेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आसूड ओढला.

पवारांच्या बैठकीमध्ये जातीयवादी टिप्पणी
प्रचारसभेत फडणवीस म्हणाले, या निवडणुकीत अनेक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न झाला. कधी सांगितलं ब्राम्हण समाज नाराज आहे, कधी सांगितलं हा समाज नाराज आहे. पण कसबा हिंदुत्त्ववादी लोकांचा आहे. शरद पवार (Sharad Pawar) यांनी काल बैठक घेतली. त्यांच्या बैठकीमध्ये एक नेता जातीयवादी टिप्पणी करतो. तो नेता म्हणतो, मोदींना आणि आरएसएसला हरवण्याकरीता देशभरातील मुसलमान आणू, मेलेला मुसलमानही येईल, असं जातीयवादी विधान पवारांच्या बैठकीत झाल्याचं फडणवीस म्हणाले.

कसब्यात काँग्रेसचा उमेदवार निवडून येणारच नाही. पण माझा सवाल आहे, जर काँग्रेसचा उमेदवार निवडून आला तर पुण्येश्वर महादेव मंदिराबद्दल त्यांची भूमिका काय असेल? हे स्पष्ट करावं, असे आवाहन फडणवीसांनी केले.