महिला कलावंतांची हेटाळणी का? गौतमीच्या ‘त्या’ व्हायरल व्हिडिओवर मंगला बनसोडेंनी व्यक्त केला संताप

प्रसिद्धीच्या झोतात आलेली नृत्यांगणा गौतमी पाटील हिचा काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात चेजिंग रूममधील व्हिडिओ काढण्यात आला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या लाजिरवाण्या प्रकारावर अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. आता लावणी सम्राज्ञी मंगला बनसोडे-करवडीकर यादेखील गौतमीच्या समर्थनार्थ उतरल्या आहेत. महिला कलावंतांचा असा व्हिडिओ काढून तो व्हायरल करणं निंदनीय आहे. महाराष्ट्रात महिला कलावंतांची अशी हेटाळणी का? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे.

एबीपी माझाशी बोलताना मंगला बनसोडे म्हणाल्या, “गौतमी पाटीलचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्याबद्दल खूप वाईट वाटत आहे. हा महाराष्ट्र जिजाऊंचा आहे, रमाबाईंचा आहे, सावित्रीबाई फुलेंचा आहे.” अशा महाराष्ट्रात एका स्त्रीची, महिला कलावंतांची हेटाळणी का केली जाते? असा सवाल मंगला बनसोडे यांनी उपस्थित केला आहे.

मंगला बनसोडे पुढे म्हणाल्या की, “गौतमी पाटील एक स्त्री आहे आणि नंतर कलावंत आहे. त्यामुळे तिचा कपडे बदलतानाचा व्हिडीओ व्हायरल करणं चुकीचं आहे. गौतमी कलावंत असली आणि तिच्या हातून चुका झाल्या असल्या तरी तिने याबद्दल माफी मागितली आहे. परंतु आता स्त्रीजातीची विटंबना होत असल्यामुळे खूप वाईट वाटत आहे. अशापद्धतीची विटंबना पुन्हा करु नये अशी माझी विनंती आहे.” मीदेखील एक कलावंत आहे, स्त्री आहे. त्यामुळे माझ्या विनंतीला मान द्या आणि तो व्हिडीओ व्हायरल करणं बंद करा. अशी विनंतीही त्यांनी केली.