गोडसे परिवाराचा अखेर हेमंत रासने यांनाच जाहीर पाठिंबा; अक्षय गोडसे यांचे स्पष्टीकरण

पुणे : पुण्यात कसबा पोटनिडणुकीचा (Kasba Bypoll Election) प्रचार हे शिगेला पोहचला असून भारतीय जनता पक्ष तसेच महाविकास आघाडीकडून जोरदार प्रचार सुरू असून एकमेकांवर आरोप प्रत्यारोप सुरु आहेत. पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचे उत्सव प्रमुख अक्षय गोडसे (Akshay Godase) यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) यांना जाहीर पाठिंबा दिल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. मात्र आता अक्षय गोडसे यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

कसब्याच्या पोटनिवडणुकीत माझा जाहीर पाठिंबा हेमंत रासने (Hemant Rasne) यांना असल्याचे त्यांनी सांगितले आहे. ते म्हणाले, माझे आणि हेमंत रासने यांचे अनेक वर्षांपासूनचे अत्यंत घनिष्ठ संबंध आहेत. हेमंत रासने हे गेले अनेक वर्षे दगडूशेठ हलवाई गणपती मंडळाचा कार्यकर्ता म्हणून अत्यंत चांगले काम करत आहेत. आता ते या विधानसभेच्या पोटनिवडणूकीत उभे आहेत. गेली ७०-८० वर्षे गोडसे-रासने कुटुंबाचा घरोबा आहे. प्रत्येक सुखदुखात ते आमच्या सोबत असतात. नगरसेवक झाले त्यावेळीही ते आशीर्वाद घेण्यासाठी तात्यासाहेबांकडे आले होते. आता या निवडणुकीत देखील गोडसे कुटुंबाचा पाठींबा त्यांनाच असल्याचे मी जाहीर करतो असं अक्षय गोडसे यांनी म्हटले आहे.

रवी भाऊ आमचेही व्यक्तिशः चांगले संबंध आहे. पण आमच्या कुटुंबाचा जाहीर पाठिंबा असं व्हिडिओत म्हंटलं नाही. रवींद्र धंगेकर मला सहज भेटायला आले होते. त्यांच्या लोकांनी मला व्हिडिओ तयार करण्याची विनंती केली. मी व्हिडिओच्या माध्यमातून फक्त शुभेच्छा दिल्या आहेत. आता मी हेमंत रासने यांना जाहीर पाठिंबा देत असल्याचे अक्षय गोडसे यांनी लोकमतशी बोलताना सांगितले आहे.