राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत आमची मतं फोडण्याचा भाजपचा डाव फसला; राष्ट्रवादीची टीका 

मुंबई  : काल झालेल्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीमध्ये एनडीएच्या उमेदवार  द्रोपदी मुर्मु (Draupadi Murmu) या निवडून आल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत भारतीय लोकशाही व संविधानाच्या रक्षणाचा कर्तव्य राष्ट्रपती भावनातून त्या निश्चितच योग्य रित्या पार पाडतील अशी अपेक्षा यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Nationalist Congress Party State Chief Spokesperson Mahesh tapase)यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील काही भाजपच्या नेत्यांनी राष्ट्रपती निवडी दरम्यान राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाचे आमदार क्रॉस वोटिंग करतील असे जाहीर केले होते. निवडणुकीचा निकाल पाहता व पडलेल्या मतदानाची पाहणी केल्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तसेच भारतीय काँग्रेस पक्षाचे मतदान एक संघ राहिलं,भाजपचा डाव फसला आणि ते नेते आता तोंडघाशी पडले असा टोला महेश तपासे यांनी भाजपला लगावला.

२०१९ पासूनच भाजप आमचे नेते / कार्यकर्ते फोडण्याचा कटकारस्थान करीत आहेत.  सत्तेवर आलेलं शिंदे फडणवीस सरकार (Shinde Fadnavis Govt) हे त्याचं जिवंत उदाहरण आहे असेही तपासे म्हणाले. राष्ट्रवादी पक्षाची बांधिलकी भारतीय राज्य घटनेशी व कल्याणकारी राज्य या संकल्पनेशी आहे आणि म्हणूनच आम्ही भाजपच्या मनुवादी व फॅसिस्ट विचारांचा मुकाबला करतच राहणार असे प्रतिउत्तर महेश तपासे यांनी भाजपला दिले.