शिंदे गटाची ताकत आणखी वाढली; उदय सामंत गुवाहाटीला रवाना 

मुंबई – शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Shiv Sena leader and minister Eknath Shinde) यांच्या बंडानंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. ४० शिवसेना आमदार आणि इतर अपक्ष आमदारासमवेत एकनाथ शिंदे गुवाहाटीमधल्या हॉटेलमध्ये थांबले आहेत. भाजपासोबत शिवसेनेनं हातमिळवणी करून सरकार स्थापन करावं अशी अट त्यांनी पक्षाला घातली असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी (Chief Minister Uddhav Thackeray)  हे कदापि शक्य नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, बंडखोर शिंदे गटाच्या व्यूव्हरचनेला निष्पभ्र करण्यासाठी तसेच शिवसेनेची पडझड रोखण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि तमाम शिवसैनिक मैदानात उतरले आहेत.या सर्व घडामोडींमुळे शिवसेनेच्या दोन गटात मोठा संघर्ष निर्माण झाला असून बंडखोर आमदारांच्या कार्यालयांवर हल्ले होत आहेत. बंडखोर आमदारांच्या विरोधात घोषणाबाजीसह पोस्टर्सला काळं फासण्याच्या घटना समोर आल्या आहे.

दरम्यान, महाराष्ट्राचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत हे देखील आता गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटात सामील होण्यासाठी गुवाहाटीला रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे. उदय सामंत हे शनिवारी शिवसेना भवन येथे झालेल्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीला देखील उपस्थित होते. त्यानंतर आता उदय सामंत हे एकनाथ शिंदे यांच्या गटात सामील झाल्याचे वृत्त समोर आले आहे. एएनआयच्या वृत्तानुसार एकनाथ शिंदेंच्या गटात सहभागी होणारे उदय सामंत हे महाराष्ट्रातील आठवे मंत्री आहेत.