एकनाथ शिंदेंच्या जीवास धोका असूनही उद्धव ठाकरेंनी सुरक्षा देवू दिली नाही – देसाई 

सातारा – शिवसेनेत एकनाथ शिंदे  (Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखाली बंडखोरी झाल्यानंतर शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) आज नाशिक जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या या दौऱ्यात बंडखोर आमदार सुहास कांदे (Suhas Kande) यांनी माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निर्देशामुळेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा व्यवस्था नाकारण्यात आली असल्याचा आरोप आमदार सुहास कांदे यांनी केला आहे.

एकनाथ शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री होते. त्यावेळी त्यांना नक्षलवाद्यांकडून धमकी आली. तरीही त्यांना झेड प्लस सुरक्षा दिली नाही. गृहमंत्री आणि गृहराज्यमंत्र्यांना सांगितलं शिंदेंना सुरक्षा देऊ नका. हा काय प्रकार आहे असं म्हणत कांदे यांनी खळबळ उडवून दिली आहे. दरम्यान, आता या मुद्द्यावर  तत्कालीन गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई (Shambhu Raje Desai) यांनी भाष्य केले आहे.

साम टीव्हीशी बोलताना ते म्हणाले, गडचिराेली (gadchiroli) जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री आणि सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जीवास धाेका हाेता. याबाबतची गृह खात्याने शहनिशा केल्यानंतर शिंदे यांना झेड पल्स सुरक्षा देण्याची तयारी दर्शवली हाेती. परंतु माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हा निर्णय घेता येणार नाही असं मला स्वत:ला माताेश्रीतून (Matoshree) माझ्या निवासस्थानी दूरध्वनी करुन मला सांगितलं. दरम्यान याबाबत आता तेच (उद्धव ठाकरे) नेमका काय उद्देश हाेता हे सांगू शकतील असेही एका प्रश्नावर देसाईंनी नमूद केले.

मुख्यमंत्री ठाकरे यांनी मला  तसे सांगितले तरी देखील मी बैठक घेऊन त्यावर सर्व अधिका-यांचे म्हणणे समजून घेतले. त्यानंतर एकनाथ शिंदे व त्यांच्या कुटुंबियांच्या सुरक्षेत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्याबाबतचा प्रस्ताव माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठविला. त्यानंतर सरकार पायउतार हाेईपर्यंत त्यास मान्यता दिली गेली नाही असंही आमदार देसाईंनी नमूद केले.