गुणरत्न सदावर्ते डेंटिस्ट होते; कॉलेजात चार वेळा नापास झाले होते ?

मुंबई – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी काही लोकांनी हल्ला केला, चपला फेकल्या व शरद पवार यांच्या नावाने अश्लाघ्य भाषेत घोषणा दिल्या. कर्मचाऱ्यांच्या या आंदोलनानंतर आता तणावाचे वातावरण निर्माण झाले असल्याचे चित्र आहे.

दरम्यान, या अचानक घडलेल्या घडामोडींमुळे राज्यातील वातावरण ढवळून निघाले असून यावर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करण्यात मश्गुल आहेत. दरम्यान, या सर्व प्रकारच्या मागे वकील गुणरत्न सदावर्ते (Guanratna sadavarte) हे असल्याचा आरोप केला जात आहे. सदावर्ते यांना २ दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असताना राष्ट्रवादीचे नेते नरेंद्र काळे (narendra kale) यांनी त्यांच्याबाबत केलेली एक पोस्ट चांगलाच चर्चेचा मुद्दा बनली आहे.

नरेंद्र काळे यांचे फेसबुक पोस्ट

गुणरत्नाचे ‘अवगुणं’ – गुणरत्नांचा थोडा सहवास आम्हाला लाभला. मी शिक्षण घेतलेल्या शासकीय दंत महाविद्यालयातूनच हे महाशय डेंटिस्ट झाले. औरंगाबाद च्या शासकीय दंत महाविद्यालयात प्रथम वर्ष परीक्षेत सलग चार वेळा ‘ गुणवत्ता पुर्ण नापास’ होण्याचा पराक्रम केल्या बद्द्ल त्यांना दंत वैद्यकीय शिक्षणापासून Debar (प्रतिबंध) करण्यात आला. त्यानंतर गुणरत्नांनी त्यांच्या गुणांचे प्रदर्शन करत चित्र विचित्र आंदोलने केली. हि आंदोलने जाणून घेण्यासाठी तत्कालीन औरंगाबाद घाटी परीसरात शिक्षण घेतलेल्या मेडीकल व डेंटल कॉलेजच्या प्राध्यापक व विद्यार्थांना विचारा.. मग ST कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा दर्जा का खालावला, भाषा का बदलली ते लक्षात येईल.

या आंदोलनासमोर नांगी टाकुन प्राधिकरणाचा Debar rule बदलून या महाशयांसाठीचे अभ्यासक्रमासाठी लावलेले प्रतिबंध उठवण्यात आले. प्रथम वर्ष चार प्रयत्नात पास होऊ न शकलेले गुणरत्न त्यांच्या अनन्यसाधारण गुणांमुळे उर्वरित चार हि वर्षे विना अडथळा पास झाले. या गुणांचे सुरस कथन ऐकायचे असेल तर दंतमहाविद्यालयातील त्या काळातील प्राध्यापकांना विचारा. पास झाल्यावर डेंटिस्ट म्हणून काम कसे करणार? पास होण्यासाठी कामाला आलेली गुणवत्ता प्रॅक्टिस मध्ये कामाला येणार नव्हती. त्यामुळे अट्टाहासाने मिळवलेले डेंटल कॉन्सिल चे प्रमाणपत्र रद्द करून ‘गुणरत्न’ वकिल झाले.

वकील झाल्यावर अलिकडच्या काळात त्यांनी ‘बार कॉन्सिल’ ची निवडणूक लढवली. त्यांच्या भडक भाषणांच्या सुरस कथा तुमच्या एखाद्या वकील मित्रा कडून ऐका. एसटी कामगारांपुढील विखारी व विषारी भाषणाचे नवल वाटणार नाही. ही भाषणे न्याय पालिकेतील अनेक उच्च पदस्थांना माहिती आहेत.

एसटी कामगारांमध्ये द्वेष भरून टोकाची भुमिका घ्यायला लावल्यामुळे , अनेक कर्मचार्‍यांनी आयुष्य संपवले. गुणरत्नांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करून महाराष्ट्रातील आंदोलनांची प्रतिमा मलीन करणाऱ्या लोकांच्या ही मनोवृत्ती ची किव करावी वाटते. त्यांना पडद्याआड कुठुन तरी रसद असल्याशिवाय खा. शरद पवार साहेबांच्या घरावर हल्ला करण्याची हिंमत होत नाही.

विकृत, भडक, द्वेष पसरवणाऱ्या व्यक्तींना किती प्रसिद्धी द्यायची याचा मिडीयाने ही विचार केला पाहिजे. टिआरपी च्या खेळात महाराष्ट्रातील राजकारणाची, विधायक आंदोलनाची प्रतिमा आपण मलीन करत आहोत ही जाणीव मिडीयाने ठेवली पाहिजे. घरावरील हल्ल्याच्या वेळी नेहमी संवेदनशील असणाऱ्या खा. सुप्रिया ताई सुळे यांचे कणखर तेचे व त्याच वेळी संवेदनशीलतेचे दर्शन महाराष्ट्राला झाले.