प्रकाश आंबेडकरांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने ठाकरे गटाची झाली कोंडी

Prakash Ambedkar : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी खुलताबाद येथील औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात एका कार्यक्रमाच्या निमित्ताने आल्यानंतर त्यांनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांसोबत औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली. प्रकाश आंबेडकर यांनी भेट दिल्यानंतर आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अलीकडच्या काळात राज्यात औरंगजेबाच्या फोटोवरुन राज्यात तणावपूर्ण परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे. त्यातच प्रकाश आंबेडकर यांनी औरंगजेबाच्या कबरीला भेट दिली.

आंबेडकरांच्या कृतीवरून विरोधक ठाकरे गटाला देखील लक्ष्य करत असून हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. त्यावर तुमची प्रतिक्रिया काय?, असा सवाल संजय राऊत (Sanjay Raut) यांना करण्यात आला. त्यावर राऊत आपल्या खास शैलीत उत्तर देतील आणि मोठी बातमी मिळेल असं सर्वांना वाटत होतं. पण राऊत हे काहीसे बॅकफूटवर दिसले. त्याला आम्ही उत्तर देऊ, अशी मोघम प्रतिक्रिया देत राऊत यांनी यावर अधिक भाष्य करण्यास नकार दिला. राऊत यांनी कोणतीच प्रतिक्रिया न दिल्याने ठाकरे गट बॅकफूटवर आलाय का? असा सवाल या निमित्ताने केला जात आहे.

दुसऱ्या बाजूला प्रकाश आंबेडकरांच्या औरंगजेब कबरीला भेट देऊन फुलं वाहण्याच्या कृतीविषयी विचारलं असता आदित्य ठाकरे म्हणाले, “मला आत्ताच माध्यमांकडून ही माहिती कळते आहे. मला त्याची माहिती घेऊ द्या आणि मग मी त्यावर बोलेन.” असं म्हणत वेळ मारून नेली.

भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी या मुद्द्यावरून ठाकरे गटाला खिंडीत पकडत टीका केली आहे. डॉ प्रकाश आंबेडकरानी संभाजीनगरात येवून औरंग्याच्या कबरीवर फुले वाहिली हे उदात्तीकरण राज्याचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे चंद्रकांत खैरे यांना मान्य का? कुठल्याही प्रश्नावर नाक उचलून बोलणारी हि मंडळी अता का गप्प? त्यांची दातखिळी बसली का? असा सवाल भाजपाचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केला आहे.