राज ठाकरेंना ‘उंदीर’ म्हणणारे बृजभूषण सिंह महाराष्ट्रात येणार

Pune – मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवरील टीकेमुळे चर्चेत आलेले उत्तर प्रदेशातील भाजपा खासदार बृजभूषण सिंह महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. १५ डिसेंबरला बृजभूषण सिंह राज्यात येणार असून मनसेकडून त्यांना कोणताही विरोध होणार नसल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान यावर बृजभूषण सिंह यांनी ‘एबीपी माझा’शी संवाद साधला आहे. राज ठाकरे विरोध करत नाहीत ही चांगली गोष्ट आहे असं बृजभूषण सिंह म्हणाले आहेत. राज ठाकरेंना माझा तात्विक विरोध असल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं आहे.

“राज ठाकरेंना माझा तात्विक विरोध होता. मी राज ठाकरेंसमोर एक अट ठेवली होती की, संतांची, जनतेची, पंतप्रधानांची माफी मागा. आपल्याकडून चूक झाल्याचं मान्य कऱण्यास मी सांगितलं होतं. माझ्या दौऱ्याला ते विरोध करणार नसतील तर चांगली गोष्ट आहे. त्यासाठी मी त्यांचा आभारी आहे,” असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलं आहे.