भारतीय मानक ब्यूरोने अप्रमाणित इलेक्ट्रिक खेळणी बनवणाऱ्या कंपनीच्या कारखान्यांवर टाकले छापे

BIS raid : खेळणी (अनिवार्य नोंदणीची आवश्यकता) गुणवत्ता नियंत्रण आदेश 2020 चे उल्लंघन केल्याप्रकरणी प्राप्त झालेल्या माहितीच्या आधारे त्वरीत कार्यवाही करत, भारतीय मानक ब्युरो (बीआयएस)च्या मुंबई शाखा कार्यालय-I च्या अधिकाऱ्यांच्या पथकाने गेल्या आठवड्यात (22 ऑगस्ट 2023) जेएव्हीपी एंटरप्रायझेस अनु. क्रमांक 144, B/11, मित्तल इस्टेट, आयेशा कंपाउंड, पोस्ट कामन, पालघर 401208, मुंबई, इथे छापा टाकला. छाप्यादरम्यान आढळून आले की ही कंपनी इलेक्ट्रिक खेळण्याचे उत्पादन, साठवणूक आणि विक्री करत होती. मात्र ही खेळणी IS15644:2006 नुसार बीआयएस प्रमाणित नव्हती आणि हे खेळणी (अनिवार्य नोंदणीची आवश्यकता) गुणवत्ता नियंत्रण आदेश 2020 चे उल्लंघन आहे.

छाप्यामध्ये सापडलेल्या अशा इलेक्ट्रिक खेळण्यांचा मोठा साठा कलम 17(1) (अ) नुसार जप्त करण्यात आला. कारण बीआयएस कायदा 2016 चे उल्लंघन झाले आहे. बीआयएस कायदा 2016 च्या कलम 17(1)(अ) चे उल्लंघन केल्यास बीआयएस कायदा 2016 नुसार दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान 2,00,000 रुपये दंड किंवा दोन्ही अशी शिक्षा होऊ शकते. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.

अशा फसवणुकीच्या घटना घडू नयेत म्हणून, सर्व ग्राहकांना बीआयएस प्रमाणित असलेल्या उत्पादनांची यादी शोधण्यासाठी बीआयएस केअर अॅप (मोबाईल अँड्रॉइड आणि आयओएस दोन्हीमध्ये उपलब्ध) वापरण्याचे आवाहन विभागाने केले आहे. तसेच, उत्पादने खरेदी करण्यापूर्वी त्यावर आयएसआय मार्क आहे ना, हे तपासण्याची विनंतीही केली आहे.