खोदकामात भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचा सपाटा; बाणेर, बालेवाडीमध्ये ४० हजार वीजग्राहकांना मनस्ताप

मेट्रोसह या सर्व कामांच्या संबंधित कंत्राटदारांकडून महावितरणच्या स्थानिक कार्यालयांना माहिती न देता भूमिगत वीजवाहिन्यांच्या ठिकाणी खोदकाम सुरु आहे.

Baner-Balewadi Damage Cables – औंध, बाणेर, बालेवाडी (Aundh, Baner, Balewadi) परिसरात मेट्रो, स्मार्ट सिटी व इतर कामांसाठी जेसीबीद्वारे सुरु असलेल्या खोदकामात महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या तोडण्याचा सपाटा सुरु आहे. त्यामुळे सुमारे ४० ते ४५ हजार वीजग्राहकांसह महावितरणला खंडित वीजपुरवठ्याचा नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. गेल्या तीन महिन्यांमध्ये तब्बल ३२ ठिकाणी वीजवाहिन्या तोडल्या आहेत.

याबाबत माहिती अशी की, बाणेर, बालेवाडी परिसरात मेट्रोचे काम सुरु आहे. या कामासाठी खोदकाम सुरु असून महावितरणच्या भूमिगत वीजवाहिन्या सर्रासपणे तोडल्या जात आहेत. विद्यापीठ चौक ते बाणेर-बालेवाडी रस्त्यावर पुणे मेट्रोकडून पिलर व स्थानकाचे कामे सुरु आहेत. मात्र या रस्त्याच्या आजूबाजूला असलेली वीजयंत्रणा स्थलांतरीत करण्याचे काम मेट्रोकडून सन २०२० पासून रखडलेले आहे. या कामाचे अंदाजपत्रक महावितरणकडून यापूर्वीच मंजूर करून देण्यात आले आहे.

तर स्मार्ट सिटीअंतर्गत विविध कामे व रस्ता रूंदीकरण तसेच पाणीपुरवठ्याच्या जलवाहिन्यांसाठी खोदकाम करण्यात येत आहे. रस्ता रूंदीकरणासाठी संबंधित वीजयंत्रणा स्थलांतरीत करण्याचे अंदाजपत्रक महावितरणकडून देण्यात आले होते. मात्र वीजयंत्रणा स्थलांतरीत न करता रस्ता रुंदीकरणाचे काम करण्यात आले. त्यामुळे महावितरणच्या २२ केव्ही क्षमतेच्या पाच वीजवाहिन्या सिमेंट कॉन्क्रिटच्या रस्त्याखाली सध्या सुमारे १५ फूट खोल दबलेल्या अवस्थेत आहेत. त्यात बिघाड झाल्यास दुरूस्तीचे काम अतिशय अवघड होणार आहे.

मेट्रोसह या सर्व कामांच्या संबंधित कंत्राटदारांकडून महावितरणच्या स्थानिक कार्यालयांना माहिती न देता भूमिगत वीजवाहिन्यांच्या ठिकाणी खोदकाम सुरु आहे. परिणामी गेल्या तीन महिन्यांमध्ये उच्च व लघुदाबाच्या ३२ ठिकाणी वीजवाहिन्या तोडल्या आहेत. त्यामुळे प्रामुख्याने बाणेर, बालेवाडी, औंध, सकाळनगर परिसरातील सुमारे ४० ते ४५ हजार ग्राहकांना खंडित वीजपुरवठ्याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे.

खोदकामात तोडलेल्या किंवा क्षतीग्रस्त झालेल्या वीजवाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी तसेच पर्यायी वीजपुरवठ्यासाठी महावितरणच्या अभियंता व कर्मचाऱ्यांना रात्री बेरात्री धावपळ करावी लागत आहे. पर्यायी वीजपुरवठ्याची सोय उपलब्ध न झाल्यास काही ठिकाणी दोन ते तीन तास वीजपुरवठा खंडित राहत आहे. यामुळे वीजविक्रीमधील नुकसानीसह तोडलेल्या वीजवाहिनीच्या दुरूस्तीचा खर्च देखील महावितरणला सहन करावा लागत आहे. एकाच ठिकाणी दोन तीन वेळा वीजवाहिनी तोडण्याचे प्रकार सुरू आहेत. त्यातच सध्या पावसाळा असल्याने भूमिगत वीजवाहिन्यांच्या दुरूस्ती कामात विविध अडथळे येत आहेत.