ADITYA-L1 : आदित्य एल-वन मिशन नेमकं आहे तरी काय? जाणून घ्या सोप्या शब्दात

ADITYA-L1 : भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रो (ISRO), सूर्याचा अभ्यास करण्यासाठी पाठवण्यात येणाऱ्या पहिल्या अवकाश वेधशाळेचं म्हणजेच, आदित्य एल-वन चं, येत्या शनिवारी प्रक्षेपण करणार आहे. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा अवकाश केंद्रातून, सकाळी 11 वाजून 50 मिनिटांनी हा उपग्रह प्रक्षेपित केला जाईल.

हा उपग्रह सूर्य आणि पृथ्वीदरम्यानच्या एल-वन या बिंदूच्या कक्षेत प्रस्थापित केला जाईल. हा बिंदू पृथ्वीपासून सुमारे दीड लाख किलोमीटर दूर असून, या बिंदू पर्यंत पोचण्यासाठी अंदाजे चार महिने लागतील. या बिन्दु जवळील कक्षेचा फायदा असा आहे की, जरी ग्रहणसदृश परिस्थिती किंवा अन्य अडथळे उद्भवले तरीही हा उपग्रह विनाअडचण सूर्यांच्या क्रियांचा अभ्यास करून शकतो.

इस्रोची कमाल : आता सूर्याचा अभ्यास करण्यासाठीच्या आदित्य एल वन यानाचं होणार प्रक्षेपण

आदित्य एल-वन या अभियानात सौर वातावरण, सौर वारे यांचाही अभ्यास करण्यात येणार आहे. या उपग्रहात सात पेलोड असतील, ज्याद्वारे सूर्याचा सर्वात आतील स्तर, त्याच्या वरील स्तर, आणि कोरोनल मास इजेक्शन नावाने ओळखल्या जाणाऱ्या सूर्याच्या सर्वात बाहेरील स्तराचं निरीक्षण करण्यात येणार आहे.

या उपग्रहाच्या मदतीने सूर्याचं तापमान, तिथलं बदलतं हवामान आणि इतर सौर यंत्रणांचा अभ्यास करता येणार आहे. देशातील नागरिकांना या उपग्रहाचं थेट प्रक्षेपण बघण्याची संधी इस्रो ने दिली आहे. श्रीहरीकोटा येथील अवकाश केंद्रातील प्रेक्षक कक्षातून हे प्रक्षेपण बघण्यासाठी lvg.shar.gov.in/VSCREGISTRATION या संकेतस्थळावर नोंदणी करण्याचं आवाहन इस्रो ने केलं आहे.