‘श्री गणेश अथर्वशिर्ष’ वर आता सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने सर्टीफिकेट कोर्स

पुणे : मन:शांतीच्या स्थैर्याचा वस्तुपाठ, व्यक्तिमत्व विकासाचा आलेख, स्वयंपूर्णतेचे दिव्य दान आणि सुख, शांती, समाधान व प्रसन्नता यांसह आत्मानंदाची महायात्रा असलेल्या श्री गणेश अथर्वशिर्ष यावरील सर्टीफिकेट कोर्सला प्रारंभ झाला. सावित्राबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मान्यतेने आणि श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या पुढाकाराने हा कोर्स होत आहे. कोणत्याही वयोगटातील व्यक्तीला हा कोर्स करता येणार असून विशेषत: विद्यार्थ्यांना या कोर्स पूर्ण केल्यानंतर एक श्रेयांक मिळणार आहे. अर्थवशिर्षावरील कोर्सच्या माध्यमातून भारतीय संस्कृती जागतिक पातळीवर नेण्याचे केले जात आहे.

श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ संस्कृत प्राकृत विभाग, लोकमान्य टिळक महाविद्यालय वणी संस्कृत विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने व्यक्तिमत्व विकासाचा आलेख – मन:शांतीचा राजमार्ग श्री गणेश अथर्वशिर्ष याविषयावरील सर्टीफिकेट कोर्सचा प्रारंभ दगडूशेठ गणपती मंदिरात झाला. यावेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.कारभारी काळे, वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे अधिष्ठाता डॉ.पराग काळकर, संस्कृत व प्राकृत विभागाचे विभागप्रमुख डॉ.देवनाथ त्रिपाठी, प्रा. डॉ.दिवाकर मोहंती, ट्रस्टचे अध्यक्ष माणिक चव्हाण, उपाध्यक्ष सुनिल रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, डॉ.अ.ल.देशमुख, ज्ञानेश्वर रासने, राजाभाऊ पायमोडे, गजानन धावडे आदी उपस्थित होते.

डॉ. कारभारी काळे म्हणाले, भारत सरकारने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अवलंबिले आहे. या कोर्सच्या माध्यमातून भारताची परंपरा सर्वांपर्यंत पोहोचणार आहे. हा कोर्स एकच विद्यापीठापुरता मर्यादित न ठेवता सर्वच विद्यापीठात असायला हवा. मंत्राचे महत्व, शारिरीक व मानसिक फायदे लोकांपर्यंत पोहोचले, तर सर्वजण याचा मनस्वी आनंद घेतील. शिक्षणाला अध्यात्म, ज्ञान व विज्ञानाची जोड देत योग्य सांगड घालणे महत्वाचे आहे. कोणतीही पूजा मनाने केली तरच त्यात आपण समर्पित होतो. मानसिक विकास झाला, तर जगाची देशाची सेवा घडेल, असेही त्यांनी सांगितले.

डॉ.अ.ल.देशमुख म्हणाले, ट्रस्टने १० वर्षांपूर्वी शिक्षण क्षेत्रात जय गणेश पालकत्व योजनेचा प्रारंभ केला. आज गणपती अथर्वशिर्ष हा भारतीय संस्कृतीचा महत्वाचा भाग आहे. ती संस्कृती जागतिक पातळीवर नेण्याचे काम श्रेयांक या पद्धतीने प्रवेश करुन केले आहे. कोर्समध्ये केजी पासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत कोणीही सहभागी होऊ शकतात. स्वानंद पुंड शास्त्री म्हणाले, सुखी, समाधानी, शांत होण्याकरिता गणेश अथर्वशिर्ष हा अपूर्व ठेवा आहे. रोजच्या जीवनात त्याची उपयुक्तता आहे. निर्गुणाच्या चिंतनासोबतच विद्यार्थ्यांना गुणांची प्राप्ती होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांप्रमाणेच इतरांनी आत्मविकासाच्या दृष्टीने या अभ्यासक्रमाचा लाभ घ्यावा.

माणिक चव्हाण म्हणाले, श्री गणपती अथर्वशिर्ष अनेकांना मुखोद्गत आहे, मात्र त्याचा अर्थ माहित नाही. त्याच्या शास्त्रीयदृष्टया अर्थाचे विवेचन ट्रस्टच्या यू टयूब चॅनलवर करण्यात आले आहे. अथर्वशिर्षाचे २१ भाग असून त्याचे विवेचन गाणपत्य विद्यावाचस्पती स्वानंद पुंड शास्त्री यांनी केले आहे. कोर्समध्ये त्याच्यासोबत एक प्रश्नमालिका येणार आहे. त्याची उत्तरे दिल्यानंतर पुढील भाग पाहता येणार असून ती पूर्ण केल्यानंतर ई मेलवर सर्टीफिकेट मिळणार आहे. सहभागी विद्यार्थ्यांना एक श्रेयांक देखील मिळणार आहे. भारतीय तत्वज्ञानाचा प्रचार-प्रसार करण्याकरिता ट्रस्टने पुढचे पाऊल उचलले असून त्यामध्ये सर्वांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.