शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे- छगन भुजबळ

नाशिक :- शिवसंग्रमचे नेते विनायक मेटे यांचं आज पहाटे अपघाती निधन झाल्याची दुःखद बातमी ऐकून तीव्र दुःख झाले असून विनायक मेटे यांचे अकाली निधन मनाला चटका लावणारे आहे अशा शोकभावना राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केल्या आहे.

छगन भुजबळ यांनी शोक संदेशात म्हटले आहे की, अतिशय सामान्य गरीब कुटुंबातून पुढे आलेले विनायक मेटे हे लढवय्या नेते होते.कष्ट करून सामाजिक चळवळीतून ते पुढे आले.शिवसंग्राम संघटनेच्या माध्यमातून विनायक मेटे यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळविण्यासाठी सातत्याने संघर्ष केला. सामाजिक आणि समाजाभिमुख कामांसाठी ते नेहमीच पुढे असायचे त्यासाठी त्यांनी अनेक चळवळी उभ्या करून अखेर पर्यंत संघर्ष केला.

एक संघर्ष करणारा चळवळीतील नेता कायमचा पडद्याआड गेला आहे. मी व माझे कुटुंबीय मेटे कुटुंबियांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो असे छगन भुजबळ यांनी शोकसंदेशात म्हटले आहे.