‘मुलाच्या राजकीय भवितव्यासाठी चंद्रकांत खैरे यांनी पक्षाचे वाटोळे केले’

छ. संभाजीनगर : छ. संभाजीनगरमधील शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी त्यांच्या मुलाच्या भवितव्यासाठी माझी पक्षातून हकालपट्टी केली. मी पक्षात काम करत असताना अनेक वेळा त्यांनी मला कनिष्ठपणाची वागणूक दिली होती, असा आरोप युवासेनेच्या राजेंद्र जंजाळ यांनी केलाय.

जिल्ह्यातील पाच आमदार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटासोबत गेल्यानंतर शिवसेना पक्षातंर्गत पडझड सुरूच आहे. (Chandrakant Khaire) शिंदे गटातील आमदार संजय शिरसाट यांनी गुरुवारी (ता. १४) मुंबईत शक्तीप्रदर्शन केले. यावेळी (Yuvasena) युवासेनेचे उपसचिव राजेंद्र जंजाळ शिरसाट यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांची शुक्रवारी (ता. १५) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईनंतर जंजाळ यांनी हल्लाबोल केला आहे.

ते म्हणाले, जिल्ह्यातील शिवसेना आपल्याच ताब्यात राहावी या अट्टाहासापोटी स्थानिक नेत्यांनीच शिवसेनेची वाट लावली. युवासेनेत आपले खच्चीकरण सुरू होते. त्यामुळे वर्ष-दीडवर्षापासून आपण बाजूला होतो. शहरात शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाचे भूमिपूजन झाले, मात्र मला निमंत्रण देण्यात आले नाही.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते क्रांती चौकातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे उद्घाटन झाले, त्यावेळी मला बाजूला ठेवण्यात आले. नुकतीच ठाकरे यांची औरंगाबादेत सभा झाली. त्यावेळी व्यासपीठावर माझी खुर्ची राखीव होती. पोलिसांकडे पासही तयार होता. पण पास मला मिळू दिला नाही, असा आरोप जंजाळ यांनी केला.