पुणे शहराच्या मध्यभागात क्रांतिकारक, महापुरुष रथांची भव्य शोभायात्रा

हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे गुढीपाडव्या आयोजन ; विविध रथांसह, मर्दानी खेळ व ग्रामगुढीचा समावेश

पुणे : भारत माता की जय… छत्रपती शिवाजी महाराज की जय… भारतीय स्वातंत्र्यसेनानींचा विजय असो… जय श्रीराम अशा घोषणा देत शहराच्या मध्यभागात भारतीय क्रांतिकारक व महापुरुषांच्या रथांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली. हिंदू नववर्ष स्वागत समितीतर्फे शहराच्या मध्यभागात गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यात्रेत सहभागी प्रभु श्रीराम मूर्ती रथाने सर्वांचे लक्ष वेधले.

महात्मा फुले मंडईतील लोकमान्य टिळक पुतळ्यापासून सकाळी शोभायात्रेला प्रारंभ झाला. यावेळी रा.स्व.संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, समितीचे संयोजक राघवेंद्र मानकर, सहसंयोजक अश्विन देवळणकर, कुणाल टिळक यांसह कार्यकर्ते व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. महिला कार्यकर्त्यांनी देखील मोठया संख्येने पारंपरिक वेशात या शोभायात्रेत सहभाग घेतला. श्री तुळशीबाग गणपती मंडळ, नवनीत मित्र मंडळ व इतर मंडळे, सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग घेतला.

क्रांतीकारक रथ, भजनी मंडळ, साडेतीन शक्तीपीठ रथ, प्रभू श्रीराम रथ, भारत माता रथ, ढोल-ताशा पथक, शंख पथक, बँड, वेत्रचर्म पथक, वेदपाठ शाळा पुणे यांसह श्री गणेश नाथ महाराज संस्थान आषाढी दिंडी क्रमांक १८३ चे वारकरी देखील यात्रेत सहभागी झाले होते. पुणेकरांनी देखील भगव्या टोप्या, भगवे फेटे घालून, धर्मध्वज (भगवा) हातात घेऊन उत्साहाने सहभाग घेतला. लोकमान्य टिळक पुतळ्यापासून निघालेल्या शोभायात्रेचा समारोप तुळशीबाग राम मंदिर, शनिपार, अप्पा बळवंत चौक मार्गे तांबडी जोगेश्वरी मंदिर येथे झाला. यावेळी येथे ग्रामगुढी देखील उभारण्यात आली.