मोदींच्या गोवा दौऱ्यात बदल, आता ‘या’ तारखेला येणार गोव्यात

पणजी : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) हे 10 फेब्रुवारी रोजी गोव्यात येत आहेत. गुरुवारी म्हापसा येथील श्री बोडगेश्वर मंदिराच्या समोरील जागेत ते भारतीय जनता पक्षाच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहेत. यापूर्वी पंतप्रधान 11 तारखेला गोव्यात येणार असे कळविण्यात आले होते. मात्र, मोदी यांचा दौरा 10 रोजी ठरला आहे. गुरुवारी संध्याकाळी 4 वाजता ते म्हापसा (Mapusa) येथे जाहीर सभेला संबोधित करतील. या बदललेल्या तारखेची नोंद गोमंतकीयांनी घ्यावी असे आवाहन प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे यांनी केले आहे.

गोवा विधानसभेच्या निवडणुकांसाठी प्रचाराला वेग आला आहे. भाजपा, काँग्रेस, तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्षांचे धुरंधर नेते ठिकठिकाणी प्रचार बैठकांमधून मतदारांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. येत्या 14 तारखेला गोव्यामध्ये निवडणुका होणार आहेत. सत्तारुढ भाजपा आणि मुख्य विरोधी पक्ष काँग्रेस यांनी या निवडणुकीत संपूर्ण बहुमत मिळण्याचा दावा केला आहे.

दरम्यान, सध्या बार्देशमधील म्हापसा मतदारसंघ हा सध्या बऱ्याच चर्चेत आहे. २०१९ साली फ्रान्सिस डिसुझा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत त्यांचे पुत्र जोशुआ हे काँग्रेसच्या सुधीर कांदोळकरांचा पराभव करून विजयी झाले. यंदा बहुरंगी लढत होत असली तरीही यावेळी सुद्धा कांदोळकर व जोशुआ मध्येच मुख्य लढत होणार आहे.