अनोख्या विषयावरील सजग कहाणी ; वारूळ

संजय ऐलवाड हे पत्रकार म्हणून सुपरिचीत आहेत; मात्र केवळ एवढाच त्यांचा परिचय पुरेसा नाही. तर ते आहेत सर्जनशील साहित्यिक … विशेषतः बालसाहित्यातील त्यांची मुशाफिरी व व्यासंग वादातीत आहे ! ‘मुलाफुलांची गाणी’ हा नितांत सुंदर बालकाव्यसंग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे. ‘भित्रा थेंब ‘ हा बालकथासंग्रहही त्यांच्या नावावर आहे. ही दोन्ही पुस्तके केवळ अप्रतिम असून आशय, विषय व निर्मितीच्या अंगाने वेगळी आहेत.

मुळात संजय ऐलवाड हे मराठवाड्यातील ग्रामीण भागातून आलेले असल्याने त्यांच्या लेखनात त्याचे प्रतिबिंब उमटलेले आहे. ग्रामीण मुलांचे भावविश्व, तेथील निसर्गसंपन्न सुंदर जीवन अलगदपणे ते वाचकांसमोर ठेवत जातात.मुलांना उपदेश देणे अथवा शहाणे करून सोडने अशी त्यांची भुमिका नाही. तर जीवन जसे आहे तसे ते रेखाटत जातात. त्यातून कुणाला काय बोध घ्यायचा तो त्यांनी घ्यावा. फार फार तर आस्वादनाच्या पातळीवर ते वाचकांशी तादात्म पावतात.

ख-या बालसाहित्याची हीच तर लक्षणे आहेत. लेखकाने वाचकाला सोबत घेऊन जावे.आपला चित्रण प्रदेश दाखवावा. वाचकाने त्यातून काय घ्यायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न ! याच प्रभल्भ वाटेवरून संजय ऐलवाड यांचा प्रवास सुरू आहे.मुलांना समजतील, गुंतवून ठेवतील व स्वतः विचार करायला भाग पाडतील, अशा बालकथा त्यांनी लिहिल्या. यातीतूनच ऐलवाड यांनी स्वतःची स्वतंत्र कथनशैली अवगत केली, जी तरल भावस्पर्शी आहे.

याच परंपरेला साजेशी वारूळ ही बालकादंबरी त्यांची नुकतीच प्रकाशित झाली आहे. वारूळ हे या कादंबरीतील प्रतिक आहे. या प्रतिकाभोवती ही कादंबरी फिरते व अत्यूच्च कथनशैलीचा टप्पा गाठते. या कादंबरीतून संजय ऐलवाड यांनी आपली प्रयोगशील बालसाहित्यीक म्हणून ओळख घट्ट केली आहे. या कादंबरीला रुढार्थाने असे एकच एक कथानक नाही. घटना घडामोडींची भाराभर गर्दी किंवा रेलचलही नाही. तरीही एक कथनशैली आपल्याला भेटते, जी वाचकांना खिळवून ठेवते.

साधे सरळ निवेदन, उत्कंठा वाढवणारी कथनशैली आणि परिसरनिष्ठ विषय विवेचन यात वाचक गुंतत जातो.एका गाव वस्तीच्या बाजूला असलेल्या वारूळामध्ये ही कादंबरी आकार घेते.रूढार्थाने वारूळ ही दूर्लक्षित वास्तू आहे. मात्र अशा दूर्लक्षित वास्तूला कादंबरीच्या केंद्रस्थानी आणून संजय ऐलवाड यांनी मोठेच काम केलेले आहे.असे करून त्यांनी ग्रामीण व शहरी बालवाचकांना या दूर्लक्षित वास्तूची व वारूळातील घटना घडामोडींची तसेच तेथे चालणाऱ्या जीवन व्यवहाराची ओळख करून दिली आहे.

हे काम वरवर दिसते तेवढे सोपे बिलकुल नव्हते.एका अनोळखी विषयाला हात घालने व त्यातून आव्हानात्मक कथानकाची निर्मिती करणे हे मोठे जिकरीचे काम होते; हे शिवधणुष्ण पेलण्यात ऐलवाड यशस्वी झाल्याचे जाणवते. केवळ सरळधोपट कथानकाची निर्मिती न करता उत्कंठावर्धक, परिणामकारक परिणाम ते साधतात. काय आहे या कादंबरीचे कथानक ? – तर यात आहे एक वारूळ… हे वारूळ दूरवरच्या गाववस्तीवरचे टेकडीपल्यालडचे आहे.तशा तर या वारूळातल्या मुंग्या सुखाने राहात होत्या, नांदत होत्या. कुणाच्या अध्यात नव्हत्या की मध्यात नव्हत्या…
मुंग्या आपल्या साचोटी, चिकाटी आणि एकोप्याने राहात होत्या.असे असले तरी मुंग्या सर्जनशील, सजग जीवन जगत होत्या.सगळे काही सुरळीत चालू असतांना अचानक मुंग्यांच्या समोर एक प्रश्न संकट म्हणून उभा राहिला.प्रश्न केवळ मुंग्यांपुरता सीमीत नव्हता. जगळ्या जगासमोरचीच ती एक ज्वलंत समस्या होती. मात्र संवेदनशील, संघटीत मुग्यांनी हा प्रश्न मनावर घेतला.प्रश्न होता तापमान वाढीचा.

जगासमोरील एका मोठ्या प्रश्नाची व त्याच्या विपरीत परिणामांची इतक्या शैलीदार पद्धतीने जाणिव करून दिलेली गोष्ट यानिमित्ताने वाचायला मिळाली.मुलांचे मनोरंजन करत करत अलगदपणे अंजन घालण्याचे काम येथे झाले आहे. हे सगळे करीत असतांना कुठलाही दबाव बालवाचकमनावर येत नाही.उलट मुंग्याप्रमाणे आपणही कार्यप्रणव व्हावे व जगासमोरील या समस्येचे उच्चाटन करावे अशी प्रेरणा ही कादंबरी देते.

मनुष्य हा जगातील सर्वात बुद्धीमान प्राणी मानला जातो.पण आपल्या ह्या कुशाग्र बुद्धीचा वापर मानवाने स्वतःच्या स्वार्थासाठीच अधीक केला आहे. प्रसंगी निसर्गावर अतिक्रमण, अन्याय , अत्याचार केला आहे. प्राण्यांची हत्या , वृक्षांची कत्तल, जमीन पोखरणे, डोंगर पोखरणे यासारख्या मानवी घटनांतून निसर्गाचे , पर्यावरणाचे अतोनात नुकसान झाले आहे. परिणामस्वरूप जागतिक तापमानवाढ, पर्यावरणाचा समतोल ढासळने, अतिवृष्टी, दुष्काळ , भुकंप, महामारी अशा घटनांत वाढ झाली आहे.वास्तविक ह्या सगळ्यांचे दुष्परिणाम मनुष्य भोगत असतांनाही यावरील उपायांकडे त्याचे लक्ष नाही, हे लक्ष वेधन्याचे काम वारूळ ही कादंबरी करते.

वाढत्या उकाळ्याने हैरान झालेल्या वारूळातील मुंग्या अस्वस्थ होतात.आणि या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी चर्चा करतात. केवळ चर्चा करून मुंग्या थांबत नाहीत तर या प्रश्नाच्या मुळाशी जाण्याचा निर्णय घेतात. वारूळातील आपले जगने असय्य कशामुळे झाले आहे ? आपल्यासारखी उकाळ्याची असय्य परस्थिती इतरत्रही आहे का? असल्यास ह्या परिस्थितीला जबाबदार कोण ? शेवटी त्यावरील उपाय काय व कसा ? ह्या सगळ्या प्रश्नांची उकल म्हणजे या कादंबरीचे कथानक!

लेखकाने फारच रंजक, सजग,तटस्थपणे हा प्रवास वाचकांपुढे ठेवला आहे. बालसुलभ भाषा , उत्कंठावर्धक शैली आणि नाविन्यपूर्ण विषयाची हाताळणी यामुळे वारूळ ही कादंबऱ्या वाचनीय झाली आहे. एकदा वाचायला घेतली म्हणूजे वाचून पूर्ण संपविल्याशिवाय पुस्तक बाजूला होत नाही.येथे लेखकाचे कसब पणाला लागलेले दिसून येते. रूढार्थाने रटाळ, अनोल्लेखीत विषयाची मांडणी लेखकाने येथे केलेली आहे; मात्र ही मांडणी तेवढीच प्रभावी झाली आहे. वारूळ वाचल्यावर एका अनोख्या भावविश्वाची रंजक सफर तर वाचकाला घडतेच सोबत एका ज्वलंत समस्येवविषयी मन सजग होते. ही च लेखकासाठीची मोठी गोष्ट आहे.

वारूळ (बालकुमार कादंबरी )
लेखक- संजय ऐलवाड
संस्कृती प्रकाशन,पुणे
प्रथमावृत्ती- नोव्हेंबर २०१९
पृष्ठे -५६ ,किंमत – १२५

अशोक कौतिक कोळी
कूड,
गणपतीनगर सेक्टर-३,
जळगावरोड, जामनेर
जि.जळगाव -४२४२०६
मो.942156842