अखेर अहमदाबाद संघाचं नाव ठरलं! आयपीएल २०२२ मध्ये ‘या’ नावाने मैदानात उतरणार

मुंबई : आयपीएल २०२२ या स्पर्धेला काही दिवसांनी सुरुवात होणार आहे. यावेळी एकुण दहा संघ मैदानात उतरणार आहे. अहमदाबाद आणि लखनऊ या नवीन संघाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या वर्षीचे आयपीएलचे सामने बघण्यासाठी प्रेक्षकांना मोठी रंगत येणार आहे. लखनऊ संघाने लखनऊ सुपर जांयट् असं नाव ठेवलं आहे. तर अहमदाबाद संघाने देखील आपल्या नावाची घोषणा केली आहे.

आयपीएलमधील अहमदाबाद संघाची मालकी सीव्हीसी कँपिटल्स कंपनीकडे आहे. सीव्हीसी कंपनीने हा संघ तब्बल ५,६२५ कोटी रूपयांना विकत घेतला आहे. सोमवारी अहमदाबाद संघाचे नामकरण करण्यात आलं आहे. त्यामुळे यापूढे अहमदाबाद संघ अहमदाबाद टायटन्स या नावाने ओळखला जाईल. संघाच्या नावाची घोषणा अधिकृत इंस्टाग्राम खात्यावरून करण्यात आली आहे.

भारताचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या संघाची धुरा सांभाळणार आहे. त्याचबरोबर अफगाणिस्तानाचा फिरकीपटू गोलंदाज राशिद खान आणि सलामीवीर फलंदाज शुभमन गिल ला संघात विकत घेतलं आहे. हार्दिक पांड्या आणि राशिद खानला पंधरा कोटी तर शुभमन गिलला आठ कोटी रुपये देऊन खरेदी केलं आहे.

आयपीएल २०२२ साठी खेळाडूंचा लिलाव देखील याच महिन्यात होणार आहे. त्यामुळे या लिलावात कोणत्या खेळाडूला लॉटरी लागते ते आता पाहणं महत्वाचं ठरणार आहे. अहमदाबाद टायटन्स या संघासाठी भारताचा वेगवान गोलंदाज आशिष नेहराकडे मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर गँरी कर्स्टन हे फलंदाजीचे प्रशिक्षक आणि मेंटर असतील.