मुख्यमंत्र्यांच्या भाषणातील तपशील पोकळ – महेश तपासे

मुंबई – सत्ता मिळवून शंभर दिवस झाल्यानंतरही मुख्यमंत्री शिंदे (Cm Eknath Shinde) यांच्या भाषणातून विकासाचे मुद्दे गायब, त्यांचे भाषण पोकळ अशी जहरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे (Mahesh Tapase) यांनी केली. यावेळी तपासे यांनी बेरोजगारी, महागाई, शेतकरी आत्महत्या या सर्व मुद्द्यांकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप  देखील त्यांनी केला आहे.

ते कुठल्यातरी नवीन योजनेची घोषणा करतील अशी अपेक्षा होती परंतु या सरकारकडे दूरदृष्टीचा अभाव असल्यामुळेच राज्याच्या विकासाचा कोणताही रोडमॅप त्यांच्याकडे नाही आणि म्हणूनच कोणत्याही विकास योजनेची  घोषणा आज मुख्यमंत्री शिंदे करू शकले नाही हे त्यांच्या मेळाव्याचा अपयश आणि अखेर जनतेच्या पदरी फक्त निराशा असा टोला महेश तपासे यांनी लगावला.

मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर आरएसएस (RSS) चे किती दडपण आहे हे आज त्यांच्या भाषणातून स्पष्ट झाले. महाराष्ट्रात उद्योग आणण्या करिता पंतप्रधान प्रयत्न करतील असे शिंदे म्हणाले आता त्यांच्या ह्या वाक्यावर जनतेची काय प्रतिक्रिया आहे ते वेगळे सांगायला नको. तपासे पुढे म्हणाले की, प्रत्येक सार्वजनिक मेळाव्यात मुख्यमंत्री शिंदेंना आपल्या बंडाचं स्पष्टीकरण द्यावं लागतं कारण त्यांना माहित आहे की महाराष्ट्रातल्या जनतेने त्यांना मुख्यमंत्री म्हणून स्वीकारलेले नाही.