Chhatrapati Sambhajinagar : सुखरुप घरी परतलेल्या पोलीस बापाला पाहून लेक ढसाढसा रडली, बाप-लेकीचा क्षण करेल भावूक

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये बुधवारी रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. जमावाने रात्री पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. शहरातील किराडपुरा भागात ही दंगल झाली. राम मंदिराजवळ तरुणांमध्ये आधी बाचाबाची झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आली. पुढे जाळपोळ आणि हाणामारी सुरूच होती.

दरम्यान सकाळी माध्यमांमध्ये बातम्या सुरु झाल्यावर ड्युटीवर असलेल्या पोलिसांच्या कुटुंबातील सदस्यांनी ते दृश्य पाहिले आणि त्यांची चिंता वाढली. याचवेळी घटनास्थळी बंदोबस्तवर असलेले सिटी चौक पोलीस ठाण्याचे कर्मचारी एस.पवार यांच्या पंधरा वर्षाच्या मुलीने बातमी पाहिली आणि थेट वडिलांना फोन लावला. वडील सुखरूप असल्याची खात्री केली. पण घरी परतताच तिने वडिलांना मिठी मारली आणि हंबरडा फोडला. ‘एबीपी माझा’ने हे वृत्त दिले आहे.

छत्रपती संभाजीनगर शहरातील किराडपुरा भागात दोन गटात वाद झाला. दरम्यान पंधरा वर्षाच्या आश्लेषाचे पोलीस खात्यात शिपाई पदावर असलेले वडील एस.पवार त्याच ठिकाणी नाईट ड्युटीला होते. रात्री झालेला वादाचे दृश्य आश्लेषाने टीव्हीवर पाहिले. त्यामुळे सकाळीच आपल्या वडिलांना फोन करून विचारपूस केली. यावेळी आमची गाडी जाळली असून, काळजी करू नको मी सुरक्षित असल्याचं पवार म्हणाले. मात्र जेव्हा पवार घरी गेले तेव्हा पंधरा वर्षाच्या आश्लेषा हिनं त्यांना मिठी मारली आणि हंबरडा फोडला. आपल्या वडिलांना सुखरूप पाहून तिला झालेला आनंद झाला आणि ती अक्षरशः रडू लागली. मुलीला रडताना पाहून पवार देखील भावूक झाले होते. याचवेळी हा भावूक क्षण त्यांनी आपल्या मोबाईलमध्ये कैद केला. त्यामुळे पोलीस कोणत्या परिस्थितीत काम करतात हे या घटनेतून समोर आले आहे.