छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानूनंच प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राची आजवर वाटचाल…

मुंबई  – शिवराज्याभिषेकाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन… राजमाता जिजाऊं माँसाहेबांना वंदन… स्वराज्याचे दुसरे छत्रपती, स्वराज्यरक्षक संभाजी महाराजांना वंदन… स्वराज्यस्थापनेत महाराजांना साथ देणाऱ्या तमाम मावळ्यांना वंदन करत सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो, अशा शब्दात विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार (AjitPawar) यांनी शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन कृतज्ञतापूर्वक वंदन केले तसेच सर्वांना शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत, हिंदवी स्वराज्य संस्थापक, रयतेचे राजे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवराज्याभिषेकांने, साडेतीनशे वर्षांपूर्वी देशात लोककल्याणकारी राज्याची, लोकशाही व्यवस्थेची पायाभरणी केली. अठरा पगड जातींना, बारा बलुतेदारांना, सर्व जाती, धर्म, भाषा, प्रांताच्या मावळ्यांना सोबत घेऊन महाराजांनी शेतकऱ्यांचे, कष्टकऱ्यांचे, रयतेचे राज्य स्थापन केले.

आदर्श राज्यकारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची स्थापना केली. गडकिल्ले भक्कम केले. घोडदळ, पायदळ, आरमारांने सुसज्ज शिस्तबद्ध सैन्यव्यवस्था निर्माण केली. अभेद्य गुप्तचर यंत्रणा उभारली. शेतीला, उद्योग, व्यापाराला प्रोत्साहन दिले. पडीक जमीन लागवडीखाली आणली. शेतसारा, करांमध्ये सवलतीचे धोरण राबवले. शेतकऱ्यांच्या भाजीच्या देठालाही हात न लावण्याची ताकीद दिली. जे हवं ते शेतकऱ्यांकडून विकत घेण्याचे आदेश काढले. महिलांना सन्मान दिला.

छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला अभिमान, स्वाभिमान दिला. कुठल्याही आव्हानाला भिडण्याचे बळ, विश्वास दिला. शिवराज्याभिषेकाने महाराष्ट्राला स्वत:चे पहिले राजे मिळाले. स्वकर्तृत्वाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राजे ठरले. महाराजांनी घालून दिलेल्या आदर्शांवरचे प्रगत, पुरोगामी महाराष्ट्राची आजवरची वाटचाल सुरु आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक ही महाराष्ट्राच्या, देशाच्या इतिहासातील सर्वात आनंदाची, अभिमानाची घटना आहे असेही अजित पवार म्हणाले.