आपल्याच पक्षाला आरसा दाखवणे कॉंग्रेसच्या आमदाराला पडले महागात; पक्षाने उगारला कारवाईचा बडगा 

Rajasthan Politics: राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्याचे राजकारण चांगलेच तापले आहे. आपल्याच सरकारवर टीका केल्याने  काँग्रेस नेते राजेंद्र गुडा यांची मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी मंत्रिपदावरून हकालपट्टी केली. मंत्रिपद सोडल्यानंतर राजेंद्र गुढा(Rajendra Gudha) आपल्या वक्तव्यावर ठाम आहेत. खरे बोलणे हा गुन्हा आहे, त्यामुळे ते यापुढेही चालणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात अनेक प्रकारच्या चर्चांना उधाण आले आहे.

एका टीव्ही चॅनलशी संवाद साधताना राजेंद्र गुडा म्हणाले, सत्य बोलणे हा गुन्हा असेल, तर मी हा गुन्हा करतच राहीन. राजस्थानमध्ये महिलांविरोधातील गुन्हे वाढले आहेत, हे सर्वांना माहीत आहे. महिलांविरोधातील गुन्ह्यांमध्ये राजस्थान पहिल्या क्रमांकावर आहे. मी खरे बोललो, त्यामुळे मुख्यमंत्र्यांना राग आला, पण यापुढेही मी सत्य बोलत राहीन.

राजेंद्र गुढा यांनी मणिपूरचा उल्लेख करून आपल्याच सरकारला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले होते. महिलांच्या सुरक्षेत आपण अपयशी ठरलो आहोत, हे मान्य करायला हवे, असे गुढा म्हणाले होते. राजस्थानमध्ये महिलांवरील अत्याचार वाढले आहेत, त्यामुळे मणिपूरऐवजी आपण स्वतःच्या घरात काय चालले अआहे हे पाहावे असं ते म्हणाले होते.