वर्ध्यातील अवैध गर्भपात प्रकरणात सापडलेल्या एकाही हरामखोराला सोडू नका – वाघ 

वर्धा – वर्धा जिल्ह्यातील आर्वीमध्ये असलेल्या कदम रुग्णालयावर एका 13 वर्षीय मुलीचा अवैध गर्भपात केल्या प्रकरणी कारवाई होत आहे. त्यातच आता आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कदम रुग्णालयाच्या परिसरातील गोबर गॅसच्या टाकीत अर्भकांच्या हाडांचे अवशेष सापडले आहेत.

दरम्यान, आधीच गर्भपात प्रकरणात हॉस्पिटलच्या संचालिका डॉ. रेखा कदम आणि एक परिचारिका संगीता काळे यांना अटक झाली आहे. मात्र पुन्हा एवढ्या मोठ्या प्रमाणात अर्भकांचे अवशेष सापडल्यानं प्रकरण अधिक गंभीर बनलं आहे. सध्या पोलीसांनी उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर्सना पाचारण करून सापडलेले अवशेष त्यांच्या ताब्यात दिले आहेत.

दरम्यान, या सर्व प्रकारावर आता भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी भाष्य केले आहे. त्या म्हणाल्या, पोलिसांना खोदकामात कवट्या हाडं गर्भपिशव्या आढळल्या.. इतक्या क्रूरपणे चिमुकल्या जीवांची छळवणूक. नियम धाब्यावर बसवले, कायदे पायदळी तुडवले…कायदे कमजोर नाहीत..त्याच्या अंमलबजावणीसाठी आग्रही रहाण्याची गरज..पुन्हा एकदा भरारी पथकं स्थापा..आणि यात सापडलेल्या एकाही हरामखोराला सोडू नका अशी मागणी वाघ यांनी केली आहे.

नेमकं काय आहे प्रकरण ?

13 वर्षांच्या अल्पवयीन पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केल्यानंतर ती गर्भवती राहिल्यावर अल्पवयीन मुलाच्या आई-वडिलांनी पीडितेचा 30 हजार रुपयांत गर्भपात केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी उघडकीस आली होती. वर्धा जिल्ह्यातील आर्वी शहरात असलेल्या नामांकित मॅटर्निटी होमच्या डॉ. रेखा कदम यांच्यासह एकूण तिघा जणांना या प्रकरणी आर्वी पोलिसांनी अटक केली होती.

डॉक्टर रेखा कदम (Doctor Rekha Kadam) यांनी गर्भपात करुन जमिनीत पुरलेले भ्रूण पोलिसांनी जप्त केले असून यावेळी खोदकाम केल्यानंतर आणखी कवट्या आणिहाडं पोलिसांना आढळून आली आहेत. याशिवाय रक्ताने माखलेले कपडे आणि एक गर्भपिशवी आढळून आली आहे. त्यामुळे वर्ध्यासह राज्यभरात एकच खळबळ उडाली आहे. सोबतच राज्याला पुन्हा एकदा परळीमधील २०१२ सालच्या डॉ. सुदाम मुंडे (Doctor Sudam Munde) प्रकरणाचीही आठवण झाली आहे.