राजसाहेब ,मानलं तुमच्या दूरदृष्टीला…तृप्ती देसाईंनी उधळली राज ठाकरेंवर स्तुतिसुमने

मुंबई : महाराष्ट्रातील दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाने घेतला. दहापेक्षा कमी कामगार असलेल्या दुकानांना मराठी पाट्या न लावण्याची सूट आता कायद्यातील पळवाट म्हणून वापरता येणार नाही. सरसकट सर्व दुकानांच्या पाट्या आता मराठी भाषेत असतील, असतील, अशी सुधारणा आता यासंदर्भातील कायद्यात केली जाणार असून या प्रस्तावाला बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने (Maharashtra Government) मंजुरी दिली.

दरम्यान, मराठी भाषेसाठी मनसे ही कायमच आघाडीवर राहिलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देखील याबाबत अनेकदा भूमिका मांडल्याच दिसून आले आहे. दरम्यान, राज्य सरकारने हा निर्णय घेतल्यानंतर आता भूमाता ब्रिगेडच्या सर्वेसर्वा तृप्ती देसाई यांनी राज ठाकरे यांचे कौतुक केले आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या, राजसाहेब ,मानलं तुमच्या दूरदृष्टीला. आपण महाराष्ट्रात राहतो, आपली मातृभाषा मराठी आहे.  सर्व दुकानांवरच्या पाट्या मराठीतच असल्या पाहिजेत यासाठी मनसेचे अध्यक्ष माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली अनेक आंदोलने झाली आणि अखेर आता मंत्रिमंडळाच्या बैठकीत ठराव संमत करण्यात आला. याचे खरे श्रेय मनसेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे आणि मनसैनिकानांच आहे.

यावरून राजसाहेबांनी याबाबतीत केलेले आंदोलन ही त्यांची दूरदृष्टी होती, हे मान्य केलेच पाहिजे, आता सगळ्याच दुकानांच्या पाट्या मराठीत दिसतील. राजसाहेबांचे मनापासून अभिनंदन आणि त्यांचे बंधू उद्धवसाहेब ठाकरे मुख्यमंत्री असल्यावर हा निर्णय घेण्यात आला याचा आणखी आनंद आम्हा सर्वांना झाला. माननीय बाळासाहेब ठाकरे यांचे एक स्वप्न पूर्ण झाले असं देसाई यांनी म्हटले आहे.