संभाजीनगरात रात्री दोन गटात राडा, अफवांवर विश्वास ठेवू नका, पोलीस आयुक्तांचं आवाहन

छत्रपती संभाजीनगर – छत्रपती संभाजीनगरमध्ये रात्री दोनच्या दरम्यान दोन गटात झालेल्या दंगलीत अनेक गाड्यांची जाळपोळ झाली. जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांना गोळीबार व अश्रुधूर नळकांड्याचा वापर करावा लागला. यामध्ये एक जण जखमी झाल्या असल्याचे वृत्त आहे. जमावाने रात्री पोलिसांच्या गाड्याही जाळल्या आहेत. शहरातील किराडपुरा भागात ही दंगल झाली. राम मंदिराजवळ तरुणांमध्ये आधी बाचाबाची झाली त्यानंतर दगडफेक करण्यात आली. पुढे जाळपोळ आणि हाणामारी सुरूच होती.

दरम्यान, एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनीही ज्या राम मंदिर परिसरात राडा झाला, त्या मंदिराला भेट दिली. मंदिरातूनच लाइव्ह करत मंदिराला कोणतंही नुकसान झालं नसल्याचं सांगितलं. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असं आवाहनही केलं. दुसऱ्या बाजूला अफवांवर विश्वास ठेवू नका असे पोलिसांनी आवाहन केले आहे.

एबीपी माझाने दिलेल्या वृत्तानुसार, शहराच्या नामांतराच्या महिनाभरानंतर संभाजीनगरात मोठा तणाव निर्माण झाला आहे. रामनवमीच्या पार्श्वभूमी राम मंदिर परिसरात तयारी सुरू असतानाच अज्ञात तरुणांच्या गटानं जयंतीसाठी आलेल्या गटावर अचानक दगडफेक सुरू केली. पाहता पाहता घटनेनं रौद्ररूप धारण केलं. पोलिसांच्या आणि खासगी मिळून 13 गाड्या जाळण्यात आल्या. काही पोलीस (Aurangabad Police) जखमी झाल्याचंही वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हवेत 12 गोळ्या झाडल्या. अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडण्यात आल्या आहेत.