त्यांनी नीचपणाचा कळस गाठला, आता मी पण गप्प बसणार नाही – करुणा शर्मा

Karuna Sharma : करूणा शर्मा यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांचं प्रतिज्ञापत्र दाखवत करूणा शर्मा म्हणाल्या की धनंजय मुंडे यांनी या प्रतिज्ञापत्रात पत्नींची संख्या लपवली आहे. कायदेशीररित्या धनंजय मुंडे दोन बायकांचे पती आहेत. ती माहिती लपवली आहे. तसंच मुलांची संख्या लपवली आहे. त्यांच्या विरोधात ज्या केसेस आहेत त्याची संख्याही धनंजय मुंडे यांनी लपवली आहे असंही करूणा शर्मा यांनी म्हटलं आहे.

त्या म्हणाल्या, मी तुम्हाला सांगू इच्छिते की आम्ही १९९६ पासून सोबत राहतो आहोत. धनंजय मुंडे आजपर्यंत जेव्हा जेव्हा देशाबाहेर गेले आहेत तेव्हा मीच त्यांच्यासोबत होते. कारण त्यांचं माझ्यावर तेवढं प्रेम त्यांचं होतं. मला धनंजय मुंडेंपासून दोन मुलं आहेत. माझ्या मुलांच्या आधार कार्डवर, पॅन कार्डवर वडील म्हणून धनंजय मुंडे यांचं नाव आहे. माझ्या आधार कार्डवर, पासपोर्टवरही धनंजय मुंडेंचं नाव आहे. या प्रतिज्ञापत्रात धनंजय मुंडे यांनी हे देखील लिहून दिलं आहे की मुलं माझी आहेत. याशिवाय माझा पासपोर्ट, माझं आधार कार्ड या सगळ्यावर करूणा धनंजय मुंडे आहे. माझ्या मुलांच्या जन्म दाखल्यांवरही धनंजय मुंडे यांचं नाव आहे.असं त्या म्हणाल्या.

माझ्या नावावर एक कोटींची पॉलिसी आहे. यामध्ये नॉमिनी म्हणून माझे पती धनंजय मुंडे यांचं नाव आहे. मी ही पॉलिसी २०१६ मध्ये काढली आहे. आज माझा मुलगा १९ वर्षांचा आहे. इतके दिवस कधीही धनंजय मुंडे यांना यामुळे कुठलीही समस्या आली नाही. पण त्यांनी जेव्हा नीचपणाचा कळस गाठला तेव्हा मी पण गप्प बसणार नाही हे मी ठरवलं असं सांगत करूणा शर्मा यांनी सगळी कागदपत्रं पत्रकार परिषदेत सादर केली.लोकसत्ताने याबाबत वृत्त दिले आहे.