शिवसेनेत प्रवेश करताच मनीषा कायंदे यांच्यावर CM शिंदे यांनी सोपवली महत्त्वाची जबाबदारी

मुंबई – एक वर्षभरापासून सुरू असलेली ठाकरे गटाची ही गळती थांबायचं नाव घेत नाहीये. बंडखोर आमदार आणि खासदारांसह ठाकरे गटाचे अनेक नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे सातत्याने शिंदे गटात प्रवेश सुरू आहेत. विधान परिषदेच्या आमदार आणि ठाकरे गटाच्या प्रवक्त्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी रविवारी (१८ जून) शिंदे गटात प्रवेश केला आहे. रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचं निवासस्थान असलेल्या ‘वर्षा’ बंगल्यावर मनिषा कायंदे यांचा पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला.

दरम्यान, हा प्रवेश होताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मनिषा कायंदे यांची सचिवपदी नियुक्ती केली. आगामी महापालिकेच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. राज्यात अनेक प्रमुख महापालिकांची मुदत संपली आहे. येणाऱ्या काळात निवडणुका होणार आहेत. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटातून शिंदे गटात जोरदार इनकमिंग सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.