छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला – ठाकरे 

औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत भाजपावर सडकून टीका केली.    हिंदुत्व, काश्मिरी पंडित,बाबरी, महागाई, पाणीप्रश्न आदी मुद्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी ढेकणं चिरडण्यापासून धर्माची अफुची गोळी इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपावर हल्ला चढवला.

मी पाणी प्रश्न असताना त्याकडे तोंड फिरवणार नाही. मी असा मूर्ख राजकारणी आहे जो या पाणी प्रश्नाला भिडतो आहे. कारण माझ्याकडे प्रामाणिकपणा आहे. किती वर्ष ऐकत बसणार? आता निधी मंजूर केलाय, वेळेत पाणी योजना पूर्ण झाली नाही, तर ठेकेदारांना दयामाया न करता तुरुंगात टाकणार आहे. मी आत्ताही शहराचं नाव बदलू शकतो, मात्र, नाव बदललं आणि पाणी प्रश्न तसाच राहिला, इतर प्रश्न तसेच राहिले तर संभाजी महाराज मला टकमक टोकावर नेतील असं मुख्यमंत्री म्हणाले.

जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाची रक्षा करता करता औरंगजेब नावाचा जवानाने बलिदान दिलं. त्याला आम्ही परकं म्हणत नाही. तो आमचा आहे असं ते म्हणाले.