अच्छे दिन आले का? कधी येणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा भाजपला थेट सवाल 

औरंगाबाद – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची औरंगाबादमध्ये सभा पार पडली. औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मंडळाच्या मैदानावर आयोजित सभेत भाजपावर सडकून टीका केली.    हिंदुत्व, काश्मिरी पंडित,बाबरी, महागाई, पाणीप्रश्न आदी मुद्यांवर भाष्य करत विरोधकांवर निशाणा साधला. या सभेत उद्धव ठाकरे यांनी ढेकणं चिरडण्यापासून धर्माची अफुची गोळी इथपर्यंत अनेक मुद्द्यांवर भाजपावर हल्ला चढवला.

अच्छे दिन आले का? कधी येणार? काहीच नाही, ते झटकून टाकतात. निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढल्या जातात. पुन्हा एकदा धर्माची अफूची गोळी द्यायची आणि धर्माच्या नावावर मतं मिळवून सत्तेवर यायचं, मतदार मेला तरी चालेल. निवडणुका आली की पुन्हा कोणती तरी मशीद पाडू म्हणजे सगळे पुन्हा त्यांच्या मागे, अशी भाजपाची थेरं आहेत असं ते म्हणाले.

जो देशासाठी मरायला तयार असतो तो कोणत्याही धर्माचा असला तरी तो आमचा आहे. हे आमचं हिंदुत्व आहे. बाळासाहेब ठाकरे यांनी आम्हाला मुसलमानांचा द्वेष करायला शिकवलं नाही. छत्रपती शिवाजी महाराजांनी कुराण सापडल्यावर त्याचा आदर केला. देशाची रक्षा करता करता औरंगजेब नावाचा जवानाने बलिदान दिलं. त्याला आम्ही परकं म्हणत नाही. तो आमचा आहे असं ते म्हणाले.