कोणता बाप आपल्या लेकीसाठी अपशब्द उच्चारेल ? ‘मुलगी झाली हो’ मालिकेतील ‘माऊ’चा किरण मानेंवर हल्लाबोल 

मुंबई : स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो (Mulgi Zali Ho) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने विलास पाटालाची भूमिका साकराताना दिसतात. अभिनेते किरण माने त्यांच्या भूमिकेमुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात.

दरम्यान, आता भाजपविरोधी राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, मालिकेत काम करणाऱ्या कलाकारांनी किरण माने (Actor Kiran Mane) यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईबाबत पहिल्यांदाच भाष्य केलं आहे.मालिकेत काम करणाऱ्या श्रावणी पिल्लई, सविता मालपेकर आणि दिव्या पुगांवकर यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली.  किरण माने यांच्यामुळे ही मालिका चालते, असा गैरसमज त्यांचा झाला होता, असं त्यांच्या सहकलाकारांनी म्हटलंय. मी आहे म्हणून चाललंय सगळं, मी कुणालाही कधीही काढून टाकेन, अशी भाषा त्यांनी वापरल्याचाही दावा किरण माने यांच्या सहकलाकारांनी केलाय.

राजकीय भूमिका घेतली, म्हणून त्यांना मालिकेतून काढलं गेलं, अशी खोटी बातमी किरण मानेंनी पसरवली, अशा गंभीर आरोप मालिकेतील कलाकारांनी केलाय. मुळात त्यांच्या वर्तवणुकीमुळे प्रोडक्शन हाऊसनं त्यांना या मालिकेतून काढण्यात आलं आहे, असा आरोप करण्यात आला आहे. याची त्यांना काहीही माहिती नव्हती, अशातलाही भाग नाही. त्यांना तीन वेळा ताकीद देण्यात आली होती. चौथ्या वेळी त्यांना मालिकेतून नारळ देण्यात आला, असाही दावा करण्यात आला आहे.

इतकंच काय तर मुलगी झाली हो मालिकेत या मुलीचे बाप म्हणून किरण माने भूमिका करत होते, त्या दिव्या पुगांवकर हिने देखील किरण मानेंवर गंभीर आरोप केले आहेत. किरण माने आणि माझे बोलणंच व्हायचे नाही. जेव्हा मी सुरुवातीला या सिरीअलच्या सेटवर आले तेव्हा त्यांनी मला सांगितले की मी तुझ्या वडिलांचा रोल प्ले करणार आहे. तर आपण सेटवरही असेच राहूया. मला तुझ्यात माझी मुलगी दिसते.

सुरुवातीचे महिने फार उत्तम गेले,” असे ती म्हणाली. “त्यानंतर मला ते विविध गोष्टींवर टोमणे मारायचे. माझ्या वजनावरुन ते मला बोलायचे. त्यानंतर त्यांनी बरेच अपशब्द उच्चारले. मला त्यांना एक प्रश्न विचारायचा आहे, जर तुम्हाला माझ्यात तुमची मुलगी दिसते, तर महाराष्ट्रातल्या प्रत्येक बापाने सांगावं की कोणता बाप आपल्या लेकीसाठी असे अपशब्द उच्चारेल? मला या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडून हवे. मालिकेचे शूटींग थांबणार नाही. त्यांना गैरवर्तवणुकीमुळे काढण्यात आले आहे. गेले वर्षभर त्यांना याबद्दल समज देत आहेत,” असेही दिव्या म्हणाली.