कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी काँग्रेसकडून चंद्रकांत जाधव यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर

कोल्हापूर – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीमध्ये कोल्हापूर उत्तर मतदार संघातून काँग्रेसचे उमेदवार चंद्रकांत जाधव हे विजयी झाले होते. मात्र डिसेंबर महिन्यात त्यांचे अकाली निधन झाले. त्यानंतर आता या मतदारसंघासाठी पोटनिवडणूक घेण्यात येत आहे. भाजपने ही निवडणूक लढवण्याची जोरदार तयारी केली असून महाविकास आघाडी देखील ही जागा जिंकण्याचा प्रयत्न करणार आहे.

दरम्यान, भाजप विरुद्ध कॉंग्रेस असा सामना होईल असे वाटत असताना शिवशक्ती सेनेकडून करुणा शर्मा-मुंडे आणि आम आदमी पक्ष देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. दरम्यान, भाजपकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर काँग्रेसकडून दिवंगत चंद्रकांत जाधव यांच्या पत्नी जयश्री जाधव (Jayashree Jadhav) यांना उमेदवारी दिली आहे.

दरम्यान, निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार 17 मार्चपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जातील, 12 एप्रिल रोजी मतदान पार पडेल, तर 16 एप्रिलला मतमोजणी होणार आहे.राजकीय जाणकारांच्या मतानुसार ही पोटनिवडणूक रंगतदार होण्याची शक्यता आहे.