‘या’ देशातून मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना दिलासा; आता क्वारंटाईन, RTPCRची गरज नाही

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दुबईसह संयुक्त अरब अमिरातीहून मुंबईत येणाऱ्या कोणत्याही प्रवाशांसाठी आतापर्यंत राबवण्यात येत असलेली विशेष प्रमाणित प्रणाली लागू न करण्याचा आदेश बृहन्मुंबई महानगपालिकेनं दिला आहे. अशा प्रवाशांसाठी सात दिवस गृहविलगी करण आणि RT-PCR चाचणी अनिवार्य करण्यात आली होती. मध्यरात्रीपासून हे नवे आदेश लागू करण्यात आले आहेत.

25 डिसेंबर रोजी जारी केलेल्या मागील आदेशानुसार, महाराष्ट्रात ओमिक्रॉन प्रकरणांच्या संख्येनं 100 चा आकडा ओलांडल्यामुळे प्रवाशांना RT-PCR चाचणीसह सात दिवसांच्या गृह विलगीकरणात राहणं बंधकारक करण्यात आलं होतं. दरम्यान अतिजोखीम असलेल्या देशांतील 184 प्रवासी काल एका दिवसात मुंबईत दाखल झाले. यापैकी 14 जणांची कोविड-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.

दरम्यान, देशात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. राज्यातही दररोज 40 हजारांच्या पुढे रुग्णसंख्येची नोंद होत आहे. अशातच मुंबईमध्ये मात्र, रुग्णांच्या संख्येमध्ये घट होत असल्याचे दिसत आहे. मुंबईत सलग चौथ्या दिवशी कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे. बुधुवारी मुंबईत 16 हजार 420, गुरुवारी 13 हजार 702 , शुक्रवारी 11 हजार 317, शनिवारी 10,661 तर रविवारी मुंबईत 7 हजार 895 नवे कोरोना बाधित आढळले होते.