किरण मानेला मोठं व्हायचंय म्हणून हा सगळा वेडेपणा सुरु आहे, मनसेनंतर आता शिवसेनाही हल्लाबोल

मुंबई – स्टार प्रवाह वाहिनीवरील मुलगी झाली हो ( mulgi zali ho ) या लोकप्रिय मालिकेत अभिनेते किरण माने विलास पाटालाची भूमिका साकराताना दिसतात. अभिनेते किरण माने त्यांच्या भूमिकेमुळे जितके चर्चेत असतात तितकेच त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे देखील चर्चेत असतात. अनेकदा ते राजकीय भूमिकाही मांडताना दिसतात.

दरम्यान, आता भाजपविरोधी राजकीय भूमिका घेतल्याने ‘मुलगी झाली हो’ मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे. एका दैनिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये किरण माने यांनीच यासंदर्भात खुलासा करत राजकीय भूमिकेमुळे आपल्याला ‘मुलगी झाली हो’ या मालिकेमधून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं सांगितलं आहे.

दरम्यान, मनसेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर (amey khopkar) यांच्याशी टीव्ही 9 मराठीने संपर्क केला. यावेळी ते फार काही बोलले नाहीत मात्र मोजक्या शब्दात त्यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, मला या प्रकरणावर काही बोलायचं नाही, किरण माने यांनीच मालिकेतील इतर कलाकारांना त्रास दिला. योग्य वेळी याबाबत आम्ही भुमिका घेऊ, असं त्यांनी सांगितलं.

विशेष म्हणजे  मनसे पाठोपाठ शिवसेनेनेही किरण माने यांच्या भूमिकेचा विरोध केला आहे. या सगळ्या प्रकरणाबाबत शिवसेनेचे नेते आणि अभिनेते आदेश बांदेकर यांच्याशी टीव्ही9 मराठीने संपर्क केला. त्यावेळी बोलताना आदेश बांदेकर म्हणाले, ‘किरण माने यांना मोठं व्हायचं आहे म्हणून ते असा वाद निर्माण करत आहेत. हा सगळा वेडेपणा आहे.’

पुढे बोलताना ते म्हणाले, “मागच्या अनेक वर्षांपासून मी या इंडस्ट्रीमध्ये काम करत आहे. पण इतक्या दिवसात मला असा कुठलाही अनुभव आलेला नाही. कुठलंही चॅनेल असं करत नाही. किरण माने यांच्या मताशी मी सहमत नाही. त्यांना मोठं व्हायचं आहे म्हणून ते हे सगळं करत आहेत”, असं आदेश बांदेकर म्हणाले.