उत्कंठता शिगेला….या तारखेपासून येते ‘भीमथडी जत्रा’ पुणेकरांच्या भेटीला.!

पुणे : कोरोना महामारी काळात अनेकांचे आतोनात नुकसान झाले. उद्योग- व्यवसाय बंद पडले. मात्र, आता जीवन पूर्वपदावर येऊन बाजार पेठा खुल्या होत आहे. मागील 15 वर्षांपासून महिला बचत गटांसाठी ‘भीमथडी जत्रा’ ही अशीच एक हक्काची बाजार पेठ आहे. अॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीचा भाग असणारे शारदा महिला संघ या साडे चार दिवसीय जत्रेचे आयोजन पुणे येथील कृषि महाविद्यालय मैदान, सिंचननगर (रेंजहिल कॉर्नर) शिवाजीनगर येथे दरवर्षी करते. यावेळी पुणेकरांचा प्रतिसाद बघण्याजोगा असतो. यामुळेच, 15 वर्षात 8500 पेक्षा जास्त महिला बचत गट यात सहभागी झाले आहेत.

संस्कृती जतन, त्यात ग्रामीण महाराष्ट्राचा तडका असणारी ‘भीमथडी जत्रा’ गुणवत्ता, मराठमोळे पारंपारिक खाद्य पदार्थ, सबुक कलाकुसरीच्या वस्तु यासाठी प्रसिद्ध आहे. तसेच दरवर्षी प्रचंड अभ्यासपूर्ण देखावे ही भीमथडी जत्रेचे विशेष आकर्षक असते. कोरोनामुळे मागील वर्षी भीमथडी जत्रा भरवण्यात आली नव्हती. मात्र या वर्षी कोव्हिड संदर्भातील शासनाचे सर्व नियम पाळून भीमथडी जत्रा 22 डिसेंबर ते 26 डिसेंबर रोजी पार पडणार असल्याचे भीमथडी जत्रेच्या आयोजिका सुनंदा पवार याांनी सांगितले. विशेष म्हणजे, कोरोना विरोधी 2 ही लसीकरण, ओळखपत्र, मास्क असणाऱ्यांनाचं या जत्रेचा आनंद घेता येईल, याची नोंद पुणेकरांनी घेणे गरजेचे आहे.

पुणेकरांची उत्कंठा शिगेला नेऊन ठेवणारी ‘भीमथडी जत्रा’ कोरोनाच्या प्रदीर्घ विश्रांती नंतर पुणेकरांसाठी काय मेजवानी घेऊन येत आहे याची वाट सर्व पुणेकर पाहत असतील यात शंकाच नाही.!